मुंबई : पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलचा अपघात थोडक्यात टळला. लोकल चर्चगेट स्थानकात आल्यानंतरही या लोकलच्या वेगावर मोटरमनचे नियंत्रण राहिले नाही आणि ही लोकल बफरवर आदळली. यात सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नुकत्याच दोन बम्बार्डियर लोकल दाखल झाल्या आहेत. चर्चगेट ते बोरीवली, विरारपर्यंत या लोकलच्या फेऱ्या होत असून, धीम्या आणि जलद मार्गावर लोकल धावत आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक बम्बार्डियर लोकल चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत होती. मात्र ही लोकल येत असतानाच तिचा वेग अधिक होता. त्याचवेळी वेगावर नियंत्रण न राहिल्याने लोकल शेवटला असलेल्या बफरवर आदळली. बफरवर आदळताच डब्यात असलेल्या प्रवाशांनाही त्याचे धक्के जाणवले. ही लोकल बफरवर आदळल्याची माहिती मिळताच तत्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. १० मिनिटे पाहणी केल्यानंतर आणि लोकल चालविण्यास कुठलाही धोका नसल्याची माहिती घेत ही लोकल नंतर रवाना करण्यात आली. बफरवर लोकल आदळल्याने ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दीही झाली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
...अन् बम्बार्डियरचा मोठा अपघात थोडक्यात टळला
By admin | Updated: May 20, 2015 02:12 IST