Join us  

प्राचीन पुरी अर्थात घारापुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 5:04 AM

ठाण्याची खाडी समुद्राला जिथे मिळते तिथेच समोर एक छोटेसे बेट आहे.

- डॉ. सूरज अ. पंडितठाण्याची खाडी समुद्राला जिथे मिळते तिथेच समोर एक छोटेसे बेट आहे. याच बेटाचे नाव घारापुरी. या बेटावर आज राजबंदर, मोराबंदर आणि शेटबंदर अशी तीन गावे आहेत. यापैकी राजबंदर या वसाहतीजवळ असलेल्या जेट्टीनजीक एक मोठा दगडी हत्ती सापडला होता. या हत्तीवरूनच या बेटाचे नाव ‘एलिफंटा’ असे ठेवण्यात आले. हा हत्ती आज मुंबईतील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराशी उभा आहे. या हत्तीजवळ एका घोड्याचे दगडी शिल्प होते.घारापुरीचे अख्खे बेटच एक पुरातत्त्वीय खजिना आहे. येथे अनेक राजांची नाणी सापडली होती. या नाण्यांचा रवींद्र लाड आदी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. या बेटावर दोन लहान टेकाडेआहेत. यापैकी उंच टेकाडावर दोन लेणी व सातवाहनकालीन स्तूपअसून दुसऱ्या टेकाडावर जगप्रसिद्ध असलेले एलिफंटा लेणे आणि इतर चार लेणी आहेत. याच दुसºया टेकाडावर ब्रिटिशकालीन तोफा असल्यामुळे याला ‘गन हिल’ असेही संबोधले जाते. या दोन टेकाडांच्या मध्ये आज एक कृत्रिम जलाशय केलेला दिसतो. या परिसराच्या शास्त्रीय गवेषणात येथे प्राचीन काळीही भिंत बांधून पाणी साठवून कृत्रिम जलाशयाची निर्मिती केली गेल्याचे आढळले आहे. लेण्यांमधील दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांबरोबरच हा जलाशय एक महत्त्वाचा गोड्या पाण्याचा स्रोत होता.घारापुरीचे बेट सातवाहन काळापासून व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. या बेटावर अनेक ठिकाणी प्राचीन वसाहतींचे पुरातत्त्वीय अवशेष विखुरलेले असून त्यापैकी राजबंदर परिसरातील काही अवशेष हे सातवाहन काळापर्यंत मागे जाणारे आहेत.भारत-रोम व्यापाऱ्यांच्या पडत्या काळात निकृष्ट दर्जाचे रोमन मद्यकुंभांसारखे कुंभ बनवले गेले. अशा प्रकारच्या काही मद्यकुंभांची खापरे घारापुरी बेटावर सापडली आहेत. यांचा काळ इसवीसनाच्या तिसºया-चौथ्या शतकातील असावा. यावरून केवळ सातवाहनकाळातच नव्हेतर, सातवाहनोत्तर काळातही घारापुरीचे व्यापारी महत्त्व अबाधित होते असे दिसते.इसवीसनाच्या सहाव्या शतकात घारापुरी ही स्थानिक कोंकणच्या मौर्य राजांची राजधानी असावी. बदामीच्या चालुक्यांच्या घराण्यातील पुलकेशी राजाच्या ऐहोळे येथील शिलालेखात या कोकणच्या मौर्य राजांच्या ‘पुरी’ नामक राजधानीवर हल्ला करून चालुक्यांनी मिळवलेल्या विजयाचे वर्णन आहे. ही पुरी म्हणजेच आजचे ‘घारापुरी’ असावे.घारापुरी बेटाचा मुख्य जमिनीशी संपर्क नक्की कुठून होता याबद्दल विद्वानांत मतमतांतरे आहेत. या बेटावर आज आपण कुलाबा येथील ‘गेट वे आॅफ इंडिया’वरून बोटीने जातो. या बेटाच्या मागील बाजूस ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ आहे. आजही येथे अवजड जहाजे बिनदिक्कत येताना दिसतात. शिवडी परिसरातूनही या बेटावर येणे शक्य आहे. समोर असलेल्या ट्रॉम्बेमधील ‘भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटर’च्या परिसरातून या बेटाशी संपर्क साधता येऊ शकतो. या परिसरात प्राचीन शिल्पे व शिलालेख सापडले आहेत. ठाण्याच्या खाडीतून येथे येता येऊ शकते. या बेटापासून अलिबागला जाणेही फार कठीण नाही.स्तूपाच्या टेकाडावरील दोन लेणी ही बौद्ध अथवा शैव आहेत याविषयी पुराव्याअभावी कोणतेच भाष्य करता येत नाही. यांचा काळ हा त्रैकुटक राजांच्या कारकिर्दीतील असावा असे शैल्यात्मकदृष्ट्या वाटते. घारापुरी बेटावर सापडलेली हत्ती व घोड्याची शिल्पे इसवीसनाच्या सहाव्या शतकातील असावीत आणि यांचा संबंध हा कलचुरी राजांशी असावा. याच कलचुरी राजांच्या कारकिर्दीत आज जगद्विख्यात असलेले एलिफंटाचे मुख्य लेणे कोरले गेले. मागील लेखात चर्चिलेल्या जोगेश्वरी येथील गुफामंदिराची ही विकसित अवस्था आहे. या लेण्याविषयी विस्तृत चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)