मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयाची पुरातन वास्तू शनिवारपासून मुंबईकर-पर्यटकांसाठी ‘‘हेरिटेज वॉक’’साठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी १५ पर्यटकांनी हजेरी लावत या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः उपस्थित महापौर किशोरी पेडणेकर यांनी अर्चना नेवरेकर व सीताराम शेट्टी या पहिल्या पर्यटकांना सोन्याचा मुलामा दिलेले पालिकेचे बोधचिन्ह, पुष्पगुच्छ व ऐतिहासिक माहिती असलेली दिनदर्शिका भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळच असणाऱ्या या देखण्या वास्तू पाहण्याचा मोह मुंबईकर-पर्यटकांना नेहमीच होतो. या वास्तूचे पर्यटन घडावे, यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार पर्यटकांचा पहिला समूह शनिवारी पालिका मुख्यालयात आला होता. पर्यटकांसोबत असलेला गाईड हा इमारतीमधील प्रत्येक भागाची विस्तृत माहिती त्यांना देईल, असे महापौरांनी सांगितले.
असे आहे देखणे मुख्यालय...
* अत्यंत कमी खर्चात ही इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन सिंहांना पंख असलेले प्रतीक नजरेस पडते.
* या ठिकाणी असलेली तिजोरी ही पहिल्या माळ्यापर्यंत विस्तृत स्वरूपात पसरली आहे. इमारतीच्या डोममधील वरच्या भागात पांडवकालीन मंदिराप्रमाणे "की" आहे, तर आतील बाजूस सोन्याचा मुलामा दिला आहे.
* गॉथिक शैलीत असणारी पालिकेची ही इमारत चार मजल्यांची असून दगडी बांधकाम आहे. या इमारतीबरोबरच पालिकेची सहा मजली विस्तारित इमारतही आहे.
* मुख्यालयाच्या इमारतीत पालिका आयुक्तांचे कार्यालय असून विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत. यात मुंबईतील २३२ नगरसेवकांसाठी असलेले मुख्य सभागृह, त्यातील महापुरुषांचे पुतळे, स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे.
ऑनलाईन बुकिंग शक्य...
या हेरिटेज वॉकसाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. गेट क्रमांक दोनपासून ते गेट क्रमांक सातपर्यंत या इमारतीचे अंतरंग सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हा ‘हेरिटेज वॉक’ मिळणार आहे.