Join us

अतिनैराश्यातून अनंत गीते यांचे बेभान वक्तव्य - खासदार सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात ‘सांगता येत नाही, सहन होत नाही’ अशी ...

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात ‘सांगता येत नाही, सहन होत नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी शरद पवारांबाबत वक्तव्य केले. गीतेंची टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्यांच्या विधानाला महत्त्व देण्याचे कारण नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी गीते यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्या टीकेला मंगळवारी तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. शरद पवार हे देशाचे नेते आणि महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अत्यंत सक्षमपणे राज्याचा कारभार चालवला जात आहे. कोविड काळातील महाराष्ट्राच्या कामाचे कौतुक होत आहे. कदाचित अडगळीत पडलेल्या नेत्यांना या साऱ्या गोष्टींचे भान राहिले नसेल. म्हणून नैराश्यापोटी गीते यांनी अशी वक्तव्ये केली, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला.

देशभरात मोदी लाट असतानाही २०१९ साली अनंत गीते यांचा रायगड, रत्नागिरीच्या जनतेने पराभव केला. तेव्हापासून ते दोन वर्षे कुठे अज्ञातवासात होते माहीत नाही. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित होत होते तेव्हा अनंत गीते यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. आघाडी केल्याबाबत पवारांचे आभार मानले, त्या घटनेचा मी साक्षीदार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

अनंत गीते यांनी जशी राष्ट्रवादीवर टीका केली तशीच टीका १५ दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्या वक्तव्याला उत्तर देण्याचे धाडस शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दाखविले. सहावेळा लोकसभेवर निवडून गेलेले अनंत गीतेही तसेच उत्तर देतील, अशी भाबडी आशा सर्व शिवसैनिकांच्या मनात होती. परंतु २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या भाजपच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षनेतृत्वाबद्दल चुकीच्या पद्धतीची वक्तव्ये केली असताना गळून पडलेला दिसला, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.