मुंबई : एका वर्षानंतर नववर्षात पहिल्यांदाच आलेली अंगारकी चतुर्थी व्हॅलेंटाइन्स डेला आल्यामुळे प्रेम आणि भक्तीच्या अनोख्या संगमाचे आज दर्शन घडले. मुंबई गुलाबी रंगात रंगली असतानाच दुसरीकडे ‘श्रीं’च्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात सोमवार रात्रीपासूनच भाविक रांगा लावून उभे होते. तसेच आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला युवकांची मोठी हजेरी लावली होती. अंगारकी चतुर्थीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव आज मंदिरात भाविकांना फुले, श्रीफळ घेऊन जाण्यास अटकाव केला होता. भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले. अंगारकीमुळे भक्तीमय झालेल्या वातावरणाला शहरात प्रेमाचा गुलाबी रंगही चढलेला दिसत होता. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही आजचा प्रेमाचा दिवस उत्साहात साजरा झाला. अनेक तरुणांनी मित्र-मैत्रिणींसह कुटुंबाबरोबरही व्हॅलेंटाइन डे साजरा केला. काही संस्थांनी अनाथ मुलांबरोबर, अपंगांबरोबर हा दिवस साजरा केला. तरुणांनी मुंबईतील चौपाट्या संध्याकाळनंतर हाऊसफुल्ल झाल्या होत्या. मुंबईतील विविध मॉल्स, हॉटेलमध्ये व्हॅलेंटाइन डेनिमित्त आॅफर ठेवण्यात आल्या होत्या. गिफ्ट्स म्हणून चॉकलेट्स, फुलांची मागणी अधिक होती. व्हॅलेंटाइन डेनिमित्त पार्ट्यांचे आयोजन केले होते. प्रेमाच्या रंगामध्ये सकाळपासूनच फेसबुक रंगून गेले होते. नवनवीन व्हॅलेंटाइनच्या फ्रेममुळे फेसबुक सजले होते. आपल्या पार्टनरबरोबरचा मेसेजसह फोटो अनेकांनी शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो अपडेट केले होते. तर व्हॉट्सअॅपवर विविध व्हॅलेंटाइनच्या प्रेमाच्या मेसेजना उधाण आले होते. त्याचबरोबर ‘सिंगल्स’साठी देखील विशेष मेसेज ग्रुपवर फिरत होते. (प्रतिनिधी)
अंगारकी, व्हॅलेंटाइनचा अनोखा संगम
By admin | Updated: February 15, 2017 05:11 IST