Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनंत तरे यांची तलवार म्यान ?

By admin | Updated: September 29, 2014 04:53 IST

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने काँगे्रसमधून आयात केलेल्या रवींद्र फाटकांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी थेट एकनाथ शिंदेच्या विरोधात कोप

ठाणे :ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने काँगे्रसमधून आयात केलेल्या रवींद्र फाटकांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी थेट एकनाथ शिंदेच्या विरोधात कोपरी - पाचपाखाडी मतदार संघात दिलेले थेट आव्हान आजही कायमच होते. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याशी केलेल्या दोन तासांच्या चर्चेनंतरही आपण आपल्या उमेदवारीवर ठाम आहोत, असे तरे यांच्या निकटवर्तीयांनी रात्री उशीरा लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे तरे यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले आहे.या विधानसभा निवडणूकीत निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतु, त्यांची घोर निराशा झाली आणि फाटकांच्या गळ्यात अखेरच्या क्षणी उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे नाराज झालेल्या अनंत तरे यांनी या मतदारसंघात फाटकांना आव्हान न देता, कोपरी - पाचापाखाडी मतदारसंघातून जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपाच्या तिकीटावर शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिले होते. दरम्यान तरे यांची मनधरणी करण्यासाठी रविवारी सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. तुम्ही पक्षातील जेष्ठ पदाधिकारी आहात, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे निर्णय घेणे चुकीचे असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सरनाईकांनी फोनवरुन चर्चा घडवून आणली़ तरीही तरे यांचा निर्णय कायम होता. सोमवारी तरे आणि उद्धवजी यांची भेट होण्याची शक्यता आहे. अशी माहिती सरनाईक यांनी दिली. दुसरीकडे या संदर्भात तरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी झालेल्या चर्चेबाबत दुजोरा दिला आहे. परंतु उध्दव ठाकरे यांच्याशी अद्याप आपली कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी त्यांच्याशी चर्चा झाल्यास त्यानंतर पुढील धोरण निश्चित केले जाईल,असे मात्र त्यांनी स्पष्ट केले. त्यात संदीप लेले हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत, परंतु ऐनवेळेस मी सुध्दा तिकीट आणल्याने ते देखील नाराज असून त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. आपण हा निर्णय आनंदाने घेतला नाही. माझ्या घरच्यांनी आणि काही हितचितकांशी झालेल्या चर्चेनंतरच आपण अतिशय दुखी कष्टी मनाने उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत टळून गेली आहे. त्यामुळे आता तरे यांचे त्यासंदर्भात समाधान करणे अशक्य आहे. त्यामुळे सोमवारची त्यांची व उद्धव ठाकरे यांची चर्चा होईल की नाही? व झाली तरी ती तरेंचे समाधान करणारी ठरेल का? हा प्रश्न तसाच कायम आहे. या घडामोडीकडे शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. तसेच शिवसैनिकातही त्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)