Join us

लाखोंचे सुके बोंबील घेऊन चोर पसार; मरोळ मच्छी मार्केटमधील प्रकार

By गौरी टेंबकर | Updated: December 27, 2023 14:32 IST

बारिया या सुक्या मच्छीचा व्यवसाय करतात. हे मासे त्या गुजरात वरून मागवत मरोळ मच्छी मार्केटमध्ये विकतात.

मुंबई: अंधेरीच्या मरोळ मच्छी मार्केटमधून  लाखो रुपयांचे सुके बोंबील घेऊन अनोळखी चोर पसार झाला. या विरोधात व्यवसायिक आरती बारिया (३३) यानी अंधेरी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारिया या सुक्या मच्छीचा व्यवसाय करतात. हे मासे त्या गुजरात वरून मागवत मरोळ मच्छी मार्केटमध्ये विकतात. त्यानुसार त्यांनी नोव्हेंबर महिन्यात जवळपास ६९६ किलो सुख्या बोंबलाची ऑर्डर दिली होती. हे बोंबील १६ नोव्हेंबरला रूपाली बावस्कर (४०) यांच्या गाड्यांमध्ये ठेवायला दिला होता. तसेच त्यासाठी सात दिवसाचे भाडे देखील त्यांनी भरले होते. मात्र १८ डिसेंबरला सकाळी बावस्कर यांनी बारिया यांना तातडीने मच्छी मार्केटमध्ये बोलावले. बारिया पोहोचल्यानंतर सुके बोंबील ठेवलेल्या १५ गोणी त्या ठिकाणाहून गायब झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर आसपासच्या मार्केटमधील व्यापारी तसेच मजूर यांच्याकडे बारिया यांनी त्यांच्या हरवलेल्या गोणीबाबत चौकशी केली.

तसेच चुकून कोणा ग्राहकाला त्याची डिलिव्हरी झाली आहे का हे देखील पाहिले. पण ती त्यांना कुठेच सापडली नाही आणि अखेर त्यांनी या विरोधात २५ डिसेंबर रोजी अंधेरी पोलिसात तक्रार दिली. चोरीला गेलेल्या सुक्या बोंबलाची किंमत जवळपास १.५० लाख रुपये असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे असून याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे