Join us  

‘हिमालय’चा जिना हलेना; आचारसंहितेपुढे काही चालेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 10:04 AM

१९९९ मध्ये आचारसंहितेत सीएसटीचा भुयारी मार्ग झाला होता सुरू.

सीमा महांगडे, मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि महिलांनाही विनासायास वापरता यावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून तिथे सरकता जिना तयार करण्यात आला आहे; पण त्याचे उद्घाटन करण्यास पालिका तयार नाही. हा जिना दोन आठवड्यांपासून उद्घाटनासाठी तयार आहे; पण त्याचे उद्घाटन लांबल्याने तो नागरिकांच्या सेवेत आलेला नाही. आचारसंहितेचे कारण पुढे करून त्याचे उद्घाटन लाबंविताना महापालिकेला अशाच आचारसंहितेच्या काळात सीएसटीसमोरच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन झाले होते, याचा मात्र विसर पडल्याचे दिसून येत आहे.  

या भुयारी मार्गाचे उद्घाटन ८ सप्टेंबर १९९९ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त के. नलीनाक्षन यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी राज्य विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होता आणि पहिल्या टप्प्याचे मतदान ५ सप्टेंबर रोजी पार पडले होते. दुसऱ्या टप्प्याचे मतदान ११ सप्टेंबर रोजी झाले होते. त्याही वेळी हा भुयारी मार्ग तयार असूनही पालिका केवळ आचारसंहितेचे निमित्त पुढे करून नागरिकांना तो वापरण्याची अनुमती देत नसल्याची टीका झाली होती. साधारणपणे राजकीय नेतृत्वाला दुखावण्यास प्रशासन तयार नसते. पण, त्यावेळी प्रशासनाला मान तुकवावी लागली आणि हा भुयारी मार्ग लोकांसाठी खुला झाला. 

सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पुलावर बसविलेल्या सरकत्या जिन्याचे काम पूर्ण झाले आहे. पण त्याचे उद्घाटन करण्यास पालिका तयार नाही, त्यासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात येत आहे. या भुयारी मार्गाचे उद्घाटन ८ सप्टेंबर १९९९ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त के. नलीनाक्षन यांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाची कोनशीलादेखील आहे. त्यावेळी राज्य विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होता, हे विशेष.                      

सात कोटी खर्चून काम पूर्ण-

१)  १४ मार्च २०१९ रोजी हा पूल कोसळून चार जण मृत्युमुखी पडले होते, तर ३१ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हा पूल तयार झाला व गतवर्षी मे महिन्यात नागरिकांसाठी खुला झाला. 

२)  ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग यांची गैरसोय दूर करण्यासाठी सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ ते ७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ७ कोटी रुपये खर्चून याचे काम पूर्ण झाले आहे. आचारसंहितेच्या काळात गाजावाजा करून मंत्र्यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करता येणार नसल्याने सरकता जिना खुला केला जात असल्याची टीका पालिकेवर होऊ लागली आहे.

सरकत्या जिन्याअभावी पादचाऱ्यांना त्रास-

१)  हा जिना अरुंद असून, सकाळी-संध्याकाळी तसेच पावसात त्याचा वापर करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

२)  रेल्वे प्रवाशांना डी. एन. रोडवरून टाइम्स ऑफ इंडिया, कामा रुग्णालय, सेंट झेवियर्स कॉलेज, जे. जे. कला महाविद्यालयांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांना येता-जाताना यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याने सरकत जिना सुरू करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस