Join us

अमुल दुधात भेसळ : भार्इंदरला दोन अटकेत

By admin | Updated: February 7, 2015 23:18 IST

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने दोन ठिकाणी छापा टाकुन अमूल दुधात भेसळ करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

भाईंदर : मीरारोड व काशिमिरा हद्दीत ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने दोन ठिकाणी छापा टाकुन अमूल दुधात भेसळ करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.एफडीएचे अन्न निरीक्षक माणिक जाधव व सुरक्षा अधिकारी गोपाळ म्हावरे यांच्या पथकाला ४ महिन्यांपुर्वी मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर २ मधील पारिजात इमारतीच्या फ्लॅट क्र. डि/४/४०४ मध्ये रमन्न पापकपोली शेट्टी व काशिमिऱ्याच्या सृष्टी कॉम्प्लेक्समधील म्हाडाच्या नूतन इमारतीत राहणारा मजगिरी कोबाल हे दोघे अमूल दुधात भेसळ करुन ते विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यातील तथ्यता तपासून घेण्यासाठी पथकाने चार महिन्यांपासून दोघांच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसापासून रात्री २ वा. पासुन पहाटेपर्यंत त्यांच्या भेसळीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. हि दुक्कल अमूल टोन्ड दुध पातेल्यात जमा करुन त्यात सांडपाणी मिसळीत होते. भेसळ करण्यात आलेले दुध पुन्हा प्लास्टिकच्या पिशवित सीलबंद करुन ते घरोघरी वितरीत करीत होते. याची शहानिशा केल्यानंतर पथकाने मीरारोड व काशिमिरा पोलिसांच्या सहकार्याने शुक्रवारी दि. ६ फेब्रुवारी रोजी सुरुवातीला काबोलच्या फ्लॅटमध्ये छापा टाकला. त्यावेळी तेथे भेसळ करण्याच्या तयारीत असलेल्या कोबालला ताब्यात घेऊन सुमारे १०३ लीटर भेसळयुक्त अमूल नष्ट करण्यात आले. त्यानंतर पथकाने मीरारोडमधील शेट्टीकडे मोर्चा वळविला. तेथे टाकलेल्या छाप्यात सुमारे २८ लीटर दुध नष्ट करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना मीरारोड व काशिमिरा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून यापूर्वी अनेकदा असे प्रकार एफडीए पथकाच्या सतर्कतेमुळे उजेडात आल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)