ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ३० -मुंबईच्या दिशेने निघालेल्या अमरावती एक्स्प्रेसचं इंजिन व एक डबा कल्याणजवळ घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सकाळीच विस्कळीत झाली आहे. कल्याण- शहाडच्या दरम्यान ही दुर्घटना अपघात झाल्याने मध्य रेल्वेच्या अप व डाऊन मार्गावरील वाहतूकही कोलमडली असून स्थानकांवर गर्दी वाढल्याने चाकरमान्यांचे मात्र अतोनात हाल होत आहेत.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास किमान दोन तास लागणार असल्याने प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
अमरावतीहून मुंबईच्या दिशेने येणा-री एक्स्प्रेस पहाटेच्या सुमारास कल्याणला येत असतानाच एक्स्प्रेसच्या इंजिनासह एक डबा रुळांवरून खाली उतरला. त्यामुळे कसा-याहून मुंबईच्या दिशेने येणा-या गाड्या अडकल्या आहेत. अप व डाऊन या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.
रेल्वे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून इंजिन व डबा रुळांवरून बाजूला हटवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास दोन ते तीन तास लागू शकतात. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत टिटवाळा व कसा-याच्या दिशेने जाणा-या लोकलचीवाहतूक स्थगीत करण्यात आली आहे, अशी घोषणा रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे.