Join us

अमिताभ, सचिन, विकी सांगणार मतदानाचे महत्त्व, लघुपटातून केली जाणार जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 8:30 AM

Amitabh Bachchan: निवडणूक आयोग आणि निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एकत्र येऊन मतदार जागरूकतेवरील लघुपटाची निर्मिती केली आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह काही सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

मुंबई  - निवडणूक आयोग आणि निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एकत्र येऊन मतदार जागरूकतेवरील लघुपटाची निर्मिती केली आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह काही सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.राजकुमार हिरानी यांनी आजवर काही ना काही संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. आता मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासोबत लघुपटाची निर्मिती केली आहे. २५ जानेवारी प्रदर्शित झालेल्या लघुपटाचे नाव ‘माय व्होट, माय ड्युटी’ असे आहे. हा लघुपट ‘एका मताचे मूल्य’ या संकल्पनेवर आधारलेला आहे. या लघुपटात दिग्गज खेळाडू व कलावंत मंडळी सहभागी झाली आहेत. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, राजकुमार राव, विकी कौशल, बोमन इराणी, आर. माधवन, रवीना टंडन, अर्शद वारसी, भूमी पेडणेकर आणि मोना सिंग यांचे संदेश समाविष्ट केले आहेत.

प्रत्येक मताचे  महत्त्व अधोरेखितनिवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करून मतदानाविषयी मतदारांमध्ये असलेली उदासीनता आणि बेपर्वाईसारखे वृत्तीविषयक अडथळे दूर करण्याचा या लघुपटाचा उद्देश आहे. राजकुमार हिरानी निर्मित आणि संजीव किशनचंदानी दिग्दर्शित, हा लघुपट नागरिकांना त्यांच्या मतदानाचे महत्त्व लक्षात आणून देतो आणि त्यांना मतदानाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक मत परिणामकारक असल्याचे हा लघुपट अधोरेखित करतो.

टॅग्स :भारतीय निवडणूक आयोगसचिन तेंडुलकरअमिताभ बच्चन