Join us  

नागराज मंजुळेला बॉलिवूडमध्ये 'बिग शॉक', अमिताभ बच्चन यांनी सोडला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 9:33 AM

अमिताभ बच्चन यांनी निर्मात्यांकडून आतापर्यंत देण्यात आलेले मानधन परत केले आहे.

मुंबई: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित 'झुंड' या चित्रपटामधून अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. चित्रपटाचे शुटिंग वारंवार पुढे ढकलले जात असल्याने अमिताभ यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे यांच्यात गेल्यावर्षी 'झुंड'च्या प्रोजेक्टवर काम करण्याविषयी चर्चा झाली होती. मात्र, काही कारणांमुळे 'झुंड'चे चित्रीकरण सातत्याने लांबणीवर पडत आले आहे. मध्यंतरी याच कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील चित्रपटाचा सेट हटविण्याच्या सूचनाही नागराज मंजुळेंना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही 'झुंड'च्या चित्रीकरणाचे गाडे फारसे पुढे सरकले नव्हते. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनीही आता चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही कारण न देता चित्रटाचे शुटिंग सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अमिताभ यांना अन्य निर्मात्यांना तारखा देता येत नव्हत्या. मात्र, आता अधिक काळ इतर निर्मात्यांना तारखा न देणे बच्चन यांना परवडणारे नाही. त्यामुळे अमिताभ यांनी 'झुंड'मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, चित्रपटाच्या मार्गात कॉपीराईटचेही काही अडथळे आहेत. परिणामी अमिताभ बच्चन यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेऊन निर्मात्यांकडून आतापर्यंत देण्यात आलेले मानधनही परत केल्याचे समजते. झुंड हा चित्रपटातून नागराज मंजुळे हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. फुटबॉलवर आधारित असणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रशिक्षकाची भूमिका साकारणार होते. ड्रग्जचे अतिसेवन व गुन्हेगारीच्या आहारी गेलेल्या मुलाचे आयुष्य फुटबॉलच्या खेळामुळे कसे बदलते, असे या चित्रपटाचे एकंदरित कथानक असल्याचे समजते. अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अमिताभ यांच्या निर्णयामुळे आता त्यांची निराशा झाली आहे.  

 

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चन