Join us  

‘दिवार’ तोडण्यासाठी अमिताभ बच्चन यांना पालिकेची महिनाभराची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 4:14 AM

रस्ता रुंदीकरणाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या जुहू येथील उद्योजक, अभिनेत्यांच्या बंगल्यांना महापालिकेने नोटीस पाठविली. मात्र, ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेरील संरक्षक भिंतीची जागा स्वत:हून मोकळी करण्यासाठी अभिनेता अमिताभ बच्चन यांना एका महिन्याची मुदत दिली आहे

मुंबई : रस्ता रुंदीकरणाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या जुहू येथील उद्योजक, अभिनेत्यांच्या बंगल्यांना महापालिकेने नोटीस पाठविली. मात्र, ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेरील संरक्षक भिंतीची जागा स्वत:हून मोकळी करण्यासाठी अभिनेता अमिताभ बच्चन यांना एका महिन्याची मुदत दिली आहे. या ३० दिवसांमध्ये बच्चन यांनी स्वत: कार्यवाही न केल्यास ही जागा ताब्यात घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती आणि बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार, दोन्ही बंगल्यांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. तिथे उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देण्यास नकार दिल्याने, पालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागेवर गुरुवारी कारवाई केली.

त्यामुळे अभिताभ यांच्या बंगल्याच्या आवारातील जागेवर पालिका कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, प्रतीक्षा बंगल्याची जागा तूर्तास ताब्यात न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी एका महिन्याच्या कालावधीत बाधित जागा स्वत: बच्चन यांनी मोकळी करतील, याची महापालिकेला प्रतीक्षा आहे. अन्यथा त्यानंतर, महापालिका स्वत: कारवाई करून ही जागा ताब्यात घेणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन