Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमित चांडाेळेचा ईडीला मिळाला एक दिवसाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:06 IST

प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय : ८ डिसेंबरपर्यंत ईडीच्या ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा ...

प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय : ८ डिसेंबरपर्यंत ईडीच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चांडाेळे याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत म्हणजेच अवघ्या एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने चांडाेळे याचा ताबा मिळावा, यासाठी विशेष न्यायालयाला ईडीच्या अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर विशेष न्यायालयाने चांडाेळे याला एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली.

२९ नोव्हेंबर रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने चांडोळे याचा ताबा ईडीला देण्यास नकार दिला होता. ईडीने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मनी लॉड्रिंगअंतर्गत चांडोळे आरोपी आहे.

सेक्युरिटी सर्व्हिस पुरवणाऱ्या आणि सरनाईक यांच्यातील व्यवहाराची माहिती आणि त्या व्यवहारांत चांडोळे याची भूमिका काय आहे? याचा तपास ईडी करीत आहे.

सोमवारी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी ईडीच्या अर्जावर पुनर्विचार करून सोमवारी संध्याकाळपर्यंत अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश विशेष न्यायालयाला दिले.

सकाळी उच्च न्यायालयाने निर्देश देताच दुपारी ३ वाजता विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या अर्जावर सुनावणी घेतली. ईडीने आरोपीविरुद्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे जमा केले आहेत. त्यात मोबाइल, संगणकामधील माहिती, हार्ड डिस्कचा समावेश आहे. पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब पाहता आरोपीचा ताबा ईडीला देणे योग्य आहे, असे विशेष न्यायालयाने म्हटले.

ईडीने उच्च न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे की, चांडाेळेचा ताबा वाढवून न देणे, हे कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. ईडीकडे बँकेची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. एमएमआरडीएकडून मिळालेली माहिती आणि कागदपत्रेही आहेत. या सर्व बाबींची चांडोळेकडे चौकशी करायची आहे. हे सर्व आवश्यक असल्याने चांडाेळेचा ताबा वाढवून देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद सिंग यांनी केला.

चांडाेळेचा या घोटाळ्यात सहभाग आहे, हे सिद्ध करणारी कागदपत्रे ईडीकडे नाहीत. सरनाईक यांना लक्ष्य करण्यासाठी त्याला अडकविण्यात येत आहे. ईडीला सरनाईक यांच्या १२ कोटी रुपये इतक्या काळ्या पैशांसंबंधी माहिती मिळाली. याची माहिती चांडाेळे यांना कशी असणार? तो सरनाईक यांचा सीए नाही. चांडाेळे सरनाईक यांचा ‘माणूस’ आहे, हे ऐकीव आहे, असे मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी निकाल राखून ठेवला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने या अर्जावर निकाल देत विशेष न्यायालयाला ईडीच्या अर्जावर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले