Join us  

१०८ रुग्णवाहिकेअभावी प्रसूती झालेल्या महिलेला नेले टॅक्सीतून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 5:48 AM

कुर्ला येथील बुद्ध कॉलनी येथे राहणारी अमिरुन्नीस खान सात महिन्यांची गरोदर होती.

मुंबई : कुर्ला स्थानकावर मंगळवारी सकाळी महिलेची प्रसूती झाली. पण, तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अखेर टॅक्सीतून रुग्णालयात नेण्यात आले. परिणामी, या घटनेनंतर लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेवर प्रवाशांकडून टीका होत आहे. दरम्यान, जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती महिलेच्या पतीने दिली.

कुर्ला येथील बुद्ध कॉलनी येथे राहणारी अमिरुन्नीस खान सात महिन्यांची गरोदर होती. मंगळवारी तिने भायखळ्यातील कस्तुरबा रुग्णालयातून उपचार करून घरी जाण्यासाठी कल्याण दिशेकडे जाणारी लोकल पकडली. गरोदर महिलेसह तिची शेजारीण होती. लोकल सुरू असताना महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. ोकल कुर्ला स्थानकावर आल्यावर दोघी उतरल्या. तेव्हा महिलेला प्रसूती वेदना असह्य झाल्या. त्या वेळी शेजारील महिलेने आणि अन्य महिला प्रवाशांनी तिची प्रसूती कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक २ वर केली. तिने मुलीला जन्म दिला. तत्काळ रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन महिलेला स्ट्रेचरवरून कुर्ला येथील भाभा रुग्णालयात नेण्याची तयारी केली. मात्र स्थानकावर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्याने पोलिसांनी टॅक्सीची व्यवस्था केली.

बाळाची प्रकृती चिंताजनकमुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अतिदक्षता विभागात ठेवले आहे. डॉक्टरांनी डिसेंबर महिन्यात प्रसूतीची तारीख दिली होती. मात्र सातव्या महिन्यातच प्रसूती झाली. त्यामुळे आता पैशांची जमावाजमव सुरू आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रवाशांनी सहकार्य केल्याचे नसीम खान म्हणाले.