Join us  

अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

By बाळकृष्ण परब | Published: January 05, 2021 5:33 PM

Amazon-MNS News : अ‍ॅमेझॉनच्या साइटवर मराठीचा पर्याय नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच या मुद्द्यावर मनसेने खळ्ळ खटॅकचा अवलंब सुरू केला होता.

मुंबई - मराठीच्या मुद्द्यावरून मनसेशी पंगा घेणाऱ्या अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीने आता सपशेल माघार घेतली आहे. राज ठाकरेंविरोधात कुठलीही तक्रार नाही असे सांगत राज ठाकरे आणि मनसेविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेला दावा मागे घेण्यासाठी अ‍ॅमेझॉनने मुंबईतील दिंडोशी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.अ‍ॅमेझॉनच्या साइटवर मराठीचा पर्याय नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच या मुद्द्यावर अ‍ॅमेझॉनच्या प्रशासनाकडून आठमुठे धोरण अवलंबण्यात आल्यानंतर मनसेने खळ्ळ खटॅकचा अवलंब सुरू केला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधा आपली आक्रमक भूमिका कायम राखली होती. अखेरीस अ‍ॅमेझॉनने माघार घेत आपल्या संकेतस्थळावर मराठीचा पर्याय लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर आता अ‍ॅमेझॉनने मनसे आणि राज ठाकरेंविरोधात न्यायालयात दाखल केलेले दावे मागे घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंविरोधात कुठलीही तक्रार नाही, असे सांगत अ‍ॅमेझॉनने मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आमेझॉनने मुंबईतील दिंडोशी न्यायालयात हा अर्ज केला आहे. आता या अर्जावर न्यायालय लवकरच निर्णय़ देईल.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनमनसेराज ठाकरेमराठी