Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या सेवेसाठी सदैव तयार

By admin | Updated: February 6, 2015 23:02 IST

मी मुंबईकर असल्याचा मला अभिमान असून महाराष्ट्राच्या सेवेसाठी कधीही बोलवा मी सदैव तयार आहे, अशी ग्वाही महानायक अमिताभ बच्चन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.

मुंबई : मी मुंबईकर असल्याचा मला अभिमान असून महाराष्ट्राच्या सेवेसाठी कधीही बोलवा मी सदैव तयार आहे, अशी ग्वाही महानायक अमिताभ बच्चन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आयोजित, ‘मुंबई नेक्स्ट’ या परिषदेत, ‘मनोरंजन, हेरिटेज आणि पर्यटनाला प्रोत्साहन’ या विषयावरील चर्चासत्रात बच्चन यांनी बॉलिवूडसमोरच्या समस्या मांडत हिंदी, मराठी सिनेमा व थिएटरचे वैभव विशद करणारे एक संग्रहालय मुंबईत असावे, अशी इच्छा व्यक्त केली. नव्या-जुन्या फिल्म जतन करण्याच्या दृष्टीने मुंबईत यंत्रणा उभारावी. आज अशा अनेक महत्त्वाच्या फिल्म नष्ट होत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.मुंबईत राहून गुजरातचे गुणगान गायिले म्हणून काहीवेळा टीकेचे धनी ठरलेले अमिताभ यांनी आज मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, गुजरातमध्ये पुरातत्वदृष्टया महत्त्वाच्या अनेक जागा आहेत. नरेंद्र मोदी तेथील मुख्यमंत्री असताना, मी त्यांची प्रसिद्धी केली होती. महाराष्ट्राला तर फारमोठा ऐतिहासिक वारसा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी सेवा देण्याची माझी तयारी आहे. मुंबईमध्ये शूटिंग करण्यासाठी लवकर परवानगी मिळत नाही. बाहेर शूटिंग करा, असे यंत्रणेचे म्हणणे असते याकडे अमिताभ यांनी लक्ष वेधले. मुंबईत वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, बरेचदा गाड्या झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभ्या केलेल्या मी बघतो. या शहराकडून आपल्याला अपेक्षा आहेत तशा शहराला असलेल्या अपेक्षाही सर्वांनी पूर्ण करायला हव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)रोते हुए आते हैं सब...रोते हुए आते है सब, या गाण्याने अमिताभ यांनी मरिन ड्राईव्ह फेमस केला होता, पण आज बॉलीवूडमधील निर्मात्यांची मुंबईबाबत या गाण्यासारखीच अवस्था आहे. चौपाटीवर शूटिंग करायचे तर दीड लाख रुपये मोजावे लागतात. गेट वे आॅफ इंडियावर शूटिंगसाठी अडीच लाख रुपये लागतात. शिवाय, १७ प्रकारच्या परवानग्या लागतात.. दिल्लीत इंडिया गेटवर मात्र सव्वा लाख रुपयेच द्यावे लागतात याकडे निर्माती एकता कपूर यांनी लक्ष वेधले. फिल्मसिटीचा मेकओव्हर गोरेगावमधील फिल्मसिटीचा मेकओव्हर लवकरच केला जाईल. त्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार झाला असल्याचे राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी या वेळी सांगितले. संग्रहालयापासून जुन्या फिल्म्स जतन करणे, शूटिंगसाठीच्या अत्याधुनिक सुविधांचा त्यात समावेश असेल, असे त्यांनी आश्वस्त केले.