Join us  

युती - आघाडीमध्ये सभापतीपदासाठी चुरस; संख्याबळ समसमान

By अतुल कुलकर्णी | Published: May 16, 2019 1:47 AM

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही जागा कोण जिंकेल यावर सभापतीपद कोणाकडे ते ठरणार आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही जागा कोण जिंकेल यावर सभापतीपद कोणाकडे ते ठरणार आहे.

पोटनिवडणुकीत ही जागा जर काँग्रेस-राष्टÑवादीने राखली तर त्यांचे विधानपरिषदेतील संख्याबळ वाढणार आहे. परिणामी त्यांना सभापतीपद स्वत:कडे राखण्यात यश येऊ शकते. शिवसेनेला उपसभापतीपद देण्याचा निर्णय मागच्या अधिवेशनात झाला होता, पण अधिवेशन संपेपर्यंत तो निर्णय अमलात आलाच नाही. सभापतीपद राष्टÑवादीकडे कायम राहणार असेल तरच उपसभापतीपद शिवसेनेच्या निलम गोºहे यांना देऊ, असा पवित्रा त्या वेळी राष्टÑवादीने घेतला होता. आता शिवाजीराव देशमुख यांची जागा जर भाजपाने जिंकली, तर सभापतीपदासाठी काँटे की टक्कर होईल.

विधानपरिषदेत सध्या भाजपा २२, शिवसेना १२ असे एकूण ३४ सदस्य युतीकडे आहेत. शिवाय सहा अपक्षांपैकी ना. गो. गाणार व प्रशांत परिचारक, तसेच राष्टÑीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे भाजपाच्या तर किशोर दराडे हे शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे युतीची संख्या ३८ होते. काँग्रेसचे १६, राष्टÑवादीचे १७ असे ३३ सदस्य आघाडीकडे आहेत. शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, आरपीआयचे योगेंद्र कवाडे, अपक्षांमधून बाळाराम पाटील हे आघाडीच्या बाजूने असल्यामुळे आघाडीच्या सदस्य संख्या ३८ होते.

श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत हे दोघे अपक्ष आहेत. देशपांडे भाजपाच्या बाजूने व सावंत आघाडीच्या बाजूने गेल्यास दोघांचे संख्याबळ प्रत्येकी ३९ होते. त्यामुळे देशमुख यांच्या जागेवर यश मिळवण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करेल. तसे झाल्यास भाजपाचे संख्याबळ ४० होईल पण त्यासाठी आधी परिचारक यांचे निलंबन रद्द करुन त्यांना सभागृहात येऊ द्यावे लागेल. शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत परिचारक यांचे निलंबन रद्द करायचे नाही अशी भूमिका घेतलेली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर शिवसेनेने परिचारकांबद्दलची भूमिका बदलली तर त्यातून त्यांचेच नुकसान होऊ शकते. म्हणून राष्टÑवादीने आम्ही तुम्हाला उपसभापतीपदासाठी मान्यता देतो, तुम्ही सभापतीपदासाठी सहकार्य करा, असे पडद्याआड चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :विधान परिषद