ठाणे : गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर यंदा सर्वपक्षीय सहकार पॅनलने सर्वाधिक जागा जिंकून झेंडा फडकवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्या ‘सहकार’ने ११ तर बहुजन विकास आघाडीसह शिवसेना राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या लोकशाही सहकारने आठ जागा जिंकल्या आहेत. दोन जागा राष्ट्रवादीच्या बंडखोर अपक्षांनी जिंकल्या आहेत. स्पष्ट कौल कोणत्याच पक्षाला न मिळाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या बँकेची ५ मे रोजी निवडणूक झाली. गुरुवारी वर्तकनगर येथील थिराणी विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया झाली. २१ पैकी १० संचालक आधीच बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये ‘सहकार’चे बाबाजी पाटील (ठाणे), देविदास पाटील (मोखाडा), राजेश सावळाराम पाटील (अंबरनाथ), दिलीप पटेकर (जव्हार), आमदार कृष्णा घोडा (डहाणू), सुभाष पवार (मुरबाड), जगन्नाथ चौधरी (विक्रमगड) आणि तलासरीतून रत्नाकर गिंभल हे आठ तर ‘लोकशाही सहकार’मधून निलेश भोईर (वाडा) आणि राजेश रघुनाथ पाटील (वसई) हे दोघे निवडून आले आहेत. उर्वरित ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार’चे अशोक पोहेकर (भटक्या विमुक्त जातीजमाती) यांनी लोकशाही सहकारच्या मस्तान फिलीप (बहुजन विकास आघाडी) यांचा ६४ मतांनी पराभव केला. पोहेकरांना ११९४ तर मस्तान यांना ११३० मते मिळाली. ‘सहकार’चे भाऊ कुऱ्हाडे (भाजपा- अर्बन बँक, मच्छीमार, पतसंस्था) यांचा २३६ मतांनी दणदणीत विजय झाला. त्यांनी लोकशाहीच्या सावकार गुंजाळ यांचा पराभव केला. कुऱ्हाडेंना ४६१ तर गुंजाळ यांना २२५ मते मिळाली. भिवंडीतील सेवा संस्थेमधून ‘सहकार’चे प्रशांत पाटील हे २१ मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर बँकेचे माजी अध्यक्ष कमलाकर टावरे यांचा पराभव केला. त्यांना २५ तर टावरेंना अवघी चार मते मिळाली. ‘लोकशाही सहकार’ पॅनलमधून शिवाजी शिंदे (राष्ट्रवादी बंडखोर : खरेदी-विक्री, गृहनिर्माण, मजूर कामगार) हे ३९२ मतांनी विजयी झाले. त्यांनी ‘सहकार’च्या सीताराम राणे (भाजपा) यांचा पराभव केला. त्यांना ८४१ तर राणेंना ४४९ मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर वसंत पोलाडिया यांना तिसऱ्या क्रमांकाची अवघी सहा मते मिळाली. अनिल मुंबईकर (शिवसेना बंडखोर : इतर मागासवर्गीय) हे २०२ मतांनी विजयी झाले. त्यांनी ‘सहकार’च्या अरुण रामकृष्ण पाटील (भाजपा) यांचा पराभव केला. त्यांना १२८४ तर पाटील यांना १०८२ मते मिळाली. पालघर सेवा संस्थेमधून मधुकर पाटील (बहुजन विकास आघाडी) यांनी ‘सहकार’च्या अनिल गावड (राष्ट्रवादी) यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. त्यांना २९ तर गावड यांना २५ मते मिळाली. राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी : अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती) यांनी बँकेचे विद्यमान प्रभारी अध्यक्ष देविदास पाटील यांचा १५७ मतांनी पराभव केला. त्यांना १२४८ तर देविदास यांना १०९१ तर अपक्ष संजय सुरळके यांना अवघी ३० मते मिळाली. महिला राखीवमधून सुनीता दिनकर आणि रेखा पष्टे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी ‘सहकार’च्या भावना डुंबरे (राष्ट्रवादी) आणि विद्या वेखंडे यांचा पराभव केला. याशिवाय, राष्ट्रवादीचे बंडखोर कपिल थळे आणि कैलास पडवळ हे दोन अपक्षही निवडून आले आहेत. थळे यांनी सहकार : राष्ट्रवादीचे अनंत शिसवे यांचा ११ मतांनी पराभव केला. त्यांना १६ तर शिसवेंना अवघी पाच मते मिळाली. लोकशाही सहकारमधून इंद्रजित पडवळ हे २३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष दशरथ तिवरेंचा पराभव केला. त्यांना ४५ तर तिवरेंना २२ मते मिळाली. स्पष्ट बहुमत ‘सहकार पॅनल’कडे असले तरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्षांना चांगलाच ‘भाव’ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा प्रथमच सर्वपक्षीयांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तरी बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने अपेक्षेपेक्षा जादा जागांवर विजय मिळविला. त्यामुळे बहुमत मिळवूनही राष्ट्रवादी आणि भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
ठाणे जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सहकारचा झेंडा
By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST