लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याच्या कथित आरोपाशी संबंधित कागदपत्रे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी दुपारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडे दिली. मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने बोगस कंपन्यांद्वारे या कारखान्यात पैसा वळविल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळत सोमय्या यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मागच्या आठवड्यात सोमय्या यांनी कागलच्या सर सेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यातील कथित १२७ कोटींच्या भ्रष्टाचारासंबंधी तक्रार व कागदपत्रे ईडीच्या बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात दिली होती. त्याला पूरक ठरणारी व गडहिंग्लज कारखान्यात केलेल्या बेनामी गुंतवणुकीबद्दल लेखापरीक्षणाच्या अहवालाच्या प्रती मंगळवारी सादर केल्या आहेत. तसेच हा कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला असून, त्याचे मालक मुश्रीफ यांचे जावई असल्याचे म्हटले आहे.
सोमय्या यांनी यासंबंधी फौजदारी कारवाईसाठी लवकरच मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार देणार असून, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोल्हापूर जिल्हाबंदी केल्याने त्याविरुद्ध आठवड्याभरात कोर्टात व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.