Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोप - प्रत्यारोपानंतर पेंग्विन देखभालीसाठी फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:09 IST

मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सर्व ...

मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सर्व विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता पालिका हे कंत्राट गुंडाळण्याच्या तयारीत आहे. तूर्तास पेंग्विनच्या कक्षाची देखभाल पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. सुधारित निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सन २०२१ ते २०२४ या तीन वर्षांच्या देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी २६ लाख रुपये खर्चाची निविदा मागवली होती. मात्र उत्पन्नात घट होत असताना पेंग्विनच्या देखभालीसाठी अनाठायी खर्च होत असल्याचा आरोप काँग्रेस, भाजपने केला होता. तर मनसेने पोस्टरबाजी सुरू केली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यावर आरोप - प्रत्यारोप होत होते.

यावर स्पष्टीकरण देत पेंग्विन आणल्यापासून प्राणिसंग्रहालयातील उत्पन्नात १२ कोटींची वाढ झाल्याचा दावा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला. मात्र पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर पेंग्विन प्रकरण शिवसेनेला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने निविदा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेच्या अखत्यारीत पेंग्विनची देखभाल केली जाणार आहे. पालिकेचे डाॅक्टर पेंग्विनचे आरोग्य व्यवस्थापन करणार आहेत.

देखभालीच्या खर्चात बचत....

पेंग्विन आणल्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी ११ कोटी ४६ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये या निविदेची मुदत संपल्याने १५ कोटी २६ लाखांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये तीन वर्षांची १० टक्के वाढीव खर्चाची तरतूदही गृहीत धरण्यात आली. मात्र या खर्चामध्येही आता कपात करून काही कामे पालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी सुधारित निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.