Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्व टॅक्सींमध्ये वापरू शकता एसी

By admin | Updated: September 9, 2015 04:44 IST

एसी टॅक्सीची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांना सध्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. मात्र हा विरोध करतानाच एका महत्त्वाच्या शासन निर्णयाचाच

मुंबई : एसी टॅक्सीची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांना सध्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. मात्र हा विरोध करतानाच एका महत्त्वाच्या शासन निर्णयाचाच विसर काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांना आणि प्रशासनाला पडलेला दिसतो. कोणतेही जादा भाडे न आकारता काळ्या-पिवळ्या टॅक्सींना मीटरवरील भाड्यातच वातानुकूलित सेवा देण्याचा शासन निर्णय आठ महिन्यांपूर्वीच झाला आहे. मात्र या निर्णयापासून प्रवासी अनभिज्ञ असून टॅक्सी संघटना आणि सरकारने त्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचे दिसते. मुंबईत मोठ्या प्रमाणात टॅक्सी धावत असून त्यांची संख्या जवळपास ४0 हजार एवढी आहे. यात फियाट कंपनीच्या जुन्या टॅक्सींची संख्या फारच कमी असून त्या जवळपास हद्दपारच होत आहेत. तर सध्या सॅन्ट्रो, मारुती, इंडिगोसह, आय-१0 सारख्या गाड्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी म्हणून रस्त्यावर धावत आहेत. काही काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये एसी सेवा आहे. मात्र ही सेवा प्रवाशांना दिली जात नव्हती. मुंबईत मोठ्या प्रमाणात खासगी कंपनीच्या टॅक्सी असल्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सींना स्पर्धा निर्माण झाली आहे. हे पाहता संघटनांनी एसी सेवा सुरू करण्याची परवानी मागितली होती. त्यानुसार हा निर्णय एमएमआरटीएकडून (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) घेण्यात येणार होता. यात काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी चालकांना एसी यंत्रणा वापरण्यास परवानगी देण्याची तसेच प्रवाशांच्या इच्छेनुसार एसी यंत्रणा सुरू ठेवल्यास टॅक्सीचे भाडे हे सध्याच्या काळ्या-पिवळ्या मीटर टॅक्सीच्या भाड्यापेक्षा दहा टक्के अधिक भाडे आकारण्याची परवानगी एमएमआरटीएकडे मागितली होती. त्यानुसार डिसेंबर २0१४ मध्ये एमएमआरटीएच्या बैठकीत कोणतेही जादा भाडे न आकारण्याचा अटीवर काळ्या-पिवळ्या टॅक्सींना एसी यंत्रणा वापरण्याची मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतरही खुद्द सरकारला आणि टॅक्सी संघटनांनाच याचा विसर पडला.प्रवासीही या निर्णयापासून अनभिज्ञच राहिल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नसल्याने याचा फायदा काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या खासगी टॅक्सी सेवा भाड्यावर २५ टक्के अधिक रक्कम आकारून एसी सेवा देत आहेत. (प्रतिनिधी)काळ्या-पिवळ्या टॅक्सीत जादा भाडे न आकारण्याच्या अटीवर एसी सेवा देण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र त्याची माहिती टॅक्सी चालकांपर्यंत तसेच प्रवाशांपर्यंत पोहोचली नाही. सध्याच्या घडीला ४0 हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी धावत असून २ हजारपेक्षा जास्त टॅक्सीजमध्ये वातानुकूलन यंत्रणा आहे. - ए.एल. क्वाड्रोस (मुंबई टॅक्सीमेन्स युनियन-महासचिव)