Join us  

वाहन चालविण्याच्या परीक्षेशिवाय आरटीओची सर्व कामे होणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 3:18 AM

परिवहन आयुक्तांची माहिती; वाहन परवाना मिळवणेही सोपे

मुंबई : वाहन चालविण्याची परीक्षा, वाहन परवाना, वाहन कर आदी कामांसाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते, परंतु आता आराटीओच्या बहुसंख्य कामे आॅनलाइन होणार आहेत. त्यामुळे केवळ शिकाऊ वाहन परवाना किंवा वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठीच आता आरटीओ कार्यालयाची पायरी चढावी लागेल. इतर सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध होतील, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी ट्रॅफिक इन्फोटेक एक्सपो परिषदेत बुधवारी दिली.शेखर चन्ने यांनी सांगितले की, राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांमध्ये एकूण ११० सेवा दिल्या जातात. यामधील ५१ सेवा आॅनलाइन आहेत. कागदपत्रे आॅनलाइन सबमिट करू शकता, फी किंवा कर आॅनलाइन भरू शकता, परंतु त्या अर्जाची प्रिंट काढून सही करून मूळ कागदपत्रे कार्यालयात स्वत: जाऊन द्यावे लागतात. त्यावर सही करण्यासाठी उपस्थित राहावे लागते, पण आता ई-साईनद्वारे ही सर्व कागदपत्रेसुद्धा आॅनलाइन सबमिट करता येणार आहेत. त्यामुळे वाहन चालविण्याच्या परीक्षेशिवाय इतर कामासाठी लोकांना आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही, असे चन्ने यांनी सांगितले.प्रामुख्याने वाहन परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात यावे लागते. शिकाऊ वाहन परवाना, वाहन परवाना, परवान्याचे नूतनीकरण, तो हरविल्यास डुप्लिकेट वाहन परवाना ही कामे कार्यालयातच केली जातात, परंतु शिकाऊ परवाना आणि वाहन परवान्याच्या वाहन चालविण्याच्या परीक्षेशिवाय सर्व प्रक्रिया आता आॅनलाइन होणार आहेत. त्यानुसार, एखाद्या वाहन परवान्याचे आॅनलाइन नूतनीकरण करता येईल. सोबतच वाहन परवान्यासाठी आॅनलाइन अर्ज करून तो घरपोच मिळविता येईल.येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणीवाहन परवान्यासाठी ई-साइनचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत किंवा त्यापूर्वीच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर सर्व कामे आॅनलाइन करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यत येईल, असे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :आरटीओ ऑफीस