Join us  

ललित कला अकादमीसाठी सर्वतोपरी सहकार्य, राम नाईक यांचे आश्वासन; शिल्पकार उत्तम पाचारणे यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 11:59 AM

द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : शिल्पकार दिवंगत उत्तम पाचारणे यांना नगरसेवक असल्यापासून ओळखतो. त्यांच्या अचानक जाण्याने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. महाराष्ट्रात ललित कला अकादमी सुरू करण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी पाचारणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

 द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राम नाईक, वरिष्ठ चित्रकार वासुदेव कामत, चित्रकार व कला अभ्यासक सुहास बहुळकर, बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उत्तम पाचारणे यांची कन्या सुरुची पाचारणे, जहांगीर आर्ट गॅलरीचे सदस्य तेजस गर्गे, सर जे. जे. आर्ट स्कूलचे गणेश तरतरे, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पल्लवी सबनीस, वरिष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव, बॅाम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र विचारे, भगवान रामपुरे, प्रा. प्रकाश भिसे, पाचारणे यांचे वडील रोहिदास, पत्नी ज्योती आणि कुटुंबीय उपस्थित होते. 

पाचारणे यांच्या सर्व प्रदर्शनांना भेट द्यायचो, असे सांगत नाईक म्हणाले की, पाचारणे मागे ठेवून गेलेले वैभव खूप मोलाचे आहे. त्यांनी ९० च्या दशकातील अपघाताची आठवण सांगितली. त्यावेळी पाचारणे यांचे वडील रोहिदास यांची भेट झाली. झोपडपट्टीत गेल्यावर पाचारणे यांच्याबाबत समजले. काम मिळविण्यासाठी माझ्याकडे आले तेव्हा ओळख झाल्याचे सांगत नाईक यांनी आठवणींना उजाळा दिला. 

 पचारणेंचे अनुभव आणि आठवणी संकलित केल्यास नवीन कलाकारांना मदत होईल, असेही नाईक म्हणाले. प्रा. मारुती शेळके यांनी ललित कला अकादमीसाठी काही तरी करण्यासाठी पाचारणे यांची सुरू असलेली धडपड जवळून पाहिल्याचे नाईक यांनी सांगितले. 

ललित कला अकादमीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आपली निवड करण्यात आल्याचे उत्तम म्हणायचे. अकादमीचा एक तरी उपक्रम महाराष्ट्रात यायला हवा यासाठी त्यांची तळमळ होती, असेही शेळके म्हणाले.

ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात व्हावे यासाठी धडपड करणारे शिल्पकार उत्तम पाचारणे यांच्या निधनानंतर तरी हे केंद्र महाराष्ट्रात व्हावे, अशी भूमिका सुहास बहुळकर व वासुदेव कामत यांनी ‘लाेकमत’मधून मांडली हाेती. 

१०० हून अधिक उपक्रम राबवून विक्रमचित्रकार सुहास बहुळकर म्हणाले की, महाराष्ट्रात ललित कला अकादमी व्हावी यासाठी पाचारणे यांनी खूप मेहनत घेतली आहे. महाराष्ट्रात ललित कला अकादमी सुरू करून पाचारणे यांचे स्वप्न लवकरात लवकर साकार करायचे आहे. ललित कला अकादमीचे अध्यक्ष असताना त्यांनी १०० हून अधिक उपक्रम राबवून विक्रम केला होता, असेही बहुळकर यांनी या प्रसंगी सांगितले. 

कलाकारांच्या कामाची नोंद ठेवणाराइतर कलाकार काय काम करतात याची नोंद ठेवणारा आणि माझ्या मित्राच्या रूपात ‘उत्तम’ माणूस गेला, अशी भावना वासुदेव कामत यांनी व्यक्त केली. त्यांचे काम वैयक्तिक स्वरूपाचे नव्हते. त्यामुळे घरातील मोठी व्यक्ती गेल्यावर जशी पोरकेपणाची जाणीव होते ती भावना आज माझ्या मनात आहे. त्यांचा बायोडेटा खूप मोठा होता, पण त्यांचे काम त्याहीपेक्षा थोर असल्याने ते चिरंतन राहील, असेही कामत म्हणाले. 

टॅग्स :मुंबईराम नाईक