Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीजगणित, विज्ञानाची विद्यार्थ्यांना वाटते भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:07 IST

परीक्षा बाेर्डाची; ऑनलाइन शिक्षणामुळे ६१ टक्के मुलांना पेपर अपूर्ण राहण्याचा धसकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाची बोर्डाची परीक्षा ...

परीक्षा बाेर्डाची; ऑनलाइन शिक्षणामुळे ६१ टक्के मुलांना पेपर अपूर्ण राहण्याचा धसका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाची बोर्डाची परीक्षा अगदी जवळ आली असताना मुंबई, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरक्षिततेच्या कारणास्तव अद्याप सुरू झालेल्या नाहीत. वर्षभर फक्त ऑनलाइन अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षा उत्तम रीतीने देऊच शकत नसल्याच्या प्रतिक्रिया ७९.८ टक्के विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील ५०.२ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा चांगल्या प्रकारे देऊच शकत नाही, असे ठाम मत व्यक्त केले. तर २९.६ टक्के विद्यार्थ्यांनी सांगता येत नाही असे म्हटले. याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना बीजगणित, विज्ञान १, भूमिती आणि विज्ञान २ सारख्या विषयांची भीती वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषेमधील इंग्रजी या विषयांत त्यांना कमी गुण मिळतील, भाषा विषयांची परीक्षा अवघड जाईल अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

विद्यार्थी, पालकांची बोर्ड परीक्षांच्या धर्तीवर नेमकी काय मते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न कुर्ला येथील गांधी बालमंदिर माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणारे जयवंत कुलकर्णी यांनी केला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातून विद्यार्थी, पालकांचे सध्याच्या ऑनलाइन शिक्षणावरील आणि बोर्डाच्या परीक्षांबद्दल त्यांच्या मनातील भीती यावरील प्रश्नाच्या साहाय्याने सर्वेक्षण केले. १,३८० हून अधिक विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात मते मांडली.

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बुक किपिंग, अकाउंट्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्ससारखे विषय अवघड जाण्याची भीती वाटत आहे. परीक्षांच्या आधी शाळा सुरू झाल्या तर फक्त परीक्षेतील गुण मिळविण्यासाठीच शिक्षकांनी शिकवावे, असे मत २५.५ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तर फक्त गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांच्या तासिका घ्याव्यात असे मत २० टक्के विद्यार्थ्यांनी मांडले. १८.६ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अतिरिक्त वेळ तासिका घेऊन आपल्या अभ्यासक्रमाची उजळणी घ्यावी अशा प्रतिक्रिया दिली. तर शाळा सुरू झाल्यावर केवळ उजळणी किंवा लेखी सराव शिक्षकांनी घ्यावा असे मतही विदयार्थ्यांनी सर्वेक्षणात मांडले.

१० महिने म्हणजे जवळपास वर्षभर ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे तब्बल ६५.१ टक्के विद्यार्थ्यांना आपला पेपर वेळेत पूर्ण होणार नाही अशी भीती वाटत आहे. तर १२.१ टक्के विद्यार्थ्यांना शुद्धलेखनाच्या व इतर चुका होण्याची भीती सतावत आहे. १० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामुळे आपले हस्ताक्षर पेपर लिहितेवेळी खराब येईल अशी भीती असून परीक्षेच्या वेळी लिखाणाचा सराव राहिला नसल्याने आपले उत्तराचे मुद्दे सुटतील अशी भीती ७ टक्के विद्यार्थ्यांना वाटत आहे.

* शंका निरसनासाठी वेगळे तंत्र वापरणे गरजेचे

विद्यर्थ्यांना ज्या विषयांची भीती वाटत आहे ते विषय शिक्षकांनी फक्त ऑनलाइन अध्यापनापेक्षा काही वेगळी तंत्र वापरून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी घरी सराव करत असताना आधारासाठी शंकानिरसन संपर्क तासिका आयोजित करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करून अशी व्यवस्था शाळा, महाविद्यालयांनी तत्काळ सुरू करावी.

- जयवंत कुलकर्णी, समुपदेशक शिक्षक

................