Join us  

Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' गोष्ट टाळलेलीच बरी; तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:02 AM

सरकारच्या वतीने लसीकरणानंतर मद्यपानाबाबत कोणतीही अधिकृत सूचना जारी केली नसली, तरीदेखील अनेक तज्ज्ञांच्या मते लसीकरणानंतर मद्यपान टाळलेलेच बरे, असा सूर दिसून येत आहे.

मुंबई : कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी आता भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सरकारने ४५ वर्षे वयावरील व्याधिग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर आता केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. मात्र, लसीकरणानंतर किंवा लसीकरणाच्या आधी किती दिवस मद्यपान करायचे नाही, याबाबत अद्यापही अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तर काही जणांच्या मनात भीतीदेखील आहे. सरकारच्या वतीने लसीकरणानंतर मद्यपानाबाबत कोणतीही अधिकृत सूचना जारी केली नसली, तरीदेखील अनेक तज्ज्ञांच्या मते लसीकरणानंतर मद्यपान टाळलेलेच बरे, असा सूर दिसून येत आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. लसीकरणानंतर अनेक नागरिकांना एक ते दोन दिवस ताप येणे, अशक्तपणा येणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. मद्यपानानंतर माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची समस्या आहे, अशांना मद्यपानंतर लगेच काही लक्षणे जाणवतात. अशा नागरिकांनी लसीकरणानंतर मद्यपान करणे चुकीचे ठरू शकते. लसीकरणानंतर मद्यपानाबाबत अनेक लोकांकडे चुकीची माहिती पोहोचविली जाते. यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.लसीकरणाच्या आधी आणि लसीकरणानंतर शक्यतो मद्यपान करणे टाळायला हवे. मद्यपानाचे शरीरावर अनेक विपरीत परिणाम दिसून येतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. सरकारच्या वतीने किंवा अन्य कोणीही याबाबत अधिकृत दुजोरा दिला नसला तरी लसीकरणाच्या दोन दिवस आधी आणि लसीकरणानंतर दोन दिवस मद्यपान टाळल्यास लसीकरणाचा शरीरावर चांगला प्रभाव पडू शकतो.- डॉ. भूपेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी, एम पश्चिम विभागलसीकरणानंतर माणसाचा आहार संतुलित असणे गरजेचे आहे. मद्यपानाच्या वेळी थंड व तेलकट पदार्थांचे अतिसेवन होते. हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. कधीतरीच मद्याचे सेवन करणारे याबाबतीत स्वतःला आवर घालू शकतात. मात्र दररोज मद्यसेवन करणाऱ्यांनी या काळात स्वतःला मद्यसेवन करण्यापासून रोखणे गरजेचे आहे.- डॉ. नरेश देसाई, एमबीबीएस 

टॅग्स :कोरोनाची लस