Join us  

मुंबईत घुमणार ‘मराठीचा गजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:19 AM

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार, विविध पक्ष, संघटना यांनी विविधांगी कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिन दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.राज्य शासनाच्या वतीने २७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजिण्यात आला आहे. भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा प्रवास दर्शविणारा आणि मराठी भाषेची सौंदर्यस्थळे मांडणारा दर्जेदार ‘प्रवास आणि प्रवाह’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.गुरुवारी, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पाइंट येथे होणाºया या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया साहित्यिकास, प्रकाशन संस्थेस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. निवड समितीने या वर्षीच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनाही गौरविण्यात येईल. मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाºया व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.मराठी भाषा दिनानिमित विधिमंडळात येत्या गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या विद्यमाने विधिमंडळात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर, ग्रंथ दिंडी, बारा बलुतेदारांचे चित्रमय दर्शन व मध्यवर्ती सभागृहात ‘इये मराठीचिये नगरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. मान मराठी मनाचा या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी फ्लॅशमॉब पार पडेल, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मुंबई काँग्रेसतर्फे मरणोत्तर ‘साहित्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. नायगावातील सदाकांत ढवण मैदानात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडेल.

टॅग्स :मराठी भाषा दिन