Join us  

अजित पवारांचा गट मुंबईतून बेदखल

By जयंत होवाळ | Published: March 29, 2024 8:26 AM

अजित पवार यांच्या गटाने प्रारंभी दक्षिण मुंबईची मागणी केली होती.

मुंबई : शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही गट मुंबईतून पार बेदखल झाले आहेत. त्यांना मित्रपक्षांनी मुंबईत लोकसभेची एकही जागा सोडलेली नाही. शरद पवार यांच्या पक्षात उत्तर-पूर्व  मुंबईची जागा न मिळाल्यामुळे किमान नाराजी तरी आहे, याउलट अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तर कसली खंतही दिसत नाही.

अजित पवार यांच्या गटाने प्रारंभी दक्षिण मुंबईची मागणी केली होती. मात्र तेथून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्याचा भाजपचा मानस असल्याने अजित पवार गटाने दक्षिण मुंबईबाबत फारसा आग्रह धरला नाही. याव्यतिरिक्त कोणत्याही जागेवर या गटाने दावा सांगितलेला नाही. मुळात अजित पवार गटाची मुंबईत फारशी ताकदच नाही, शिवाय अजित पवार यांचे मुंबईपेक्षा पश्चिम महाराष्ट्रावर जास्त लक्ष असल्याने पक्षाला मुंबईत नेतृत्व नाही.

उरणार फक्त प्रचारासाठी...मुंबईतील जागांबाबत दोन्ही राष्ट्रवादींकडून फार जोर लावला गेला नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता तर जागावाटप आणि उमेदवारही ठरले असल्याने मित्रपक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करणे एवढेच हातात उरले आहे.

उत्तर पूर्वसाठी राखी जाधव आग्रहीउत्तर-पूर्व मतदारसंघासाठी बुधवारी  शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली. पण ती दखल घेण्याएवढीही नहती. पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी या मतदारसंघासाठी आमचा आग्रह कायम असून पक्षाच्या संसदीय मंडळापुढे  आम्ही आमचे म्हणणे  मांडले आहे, असे सांगितले. उत्तर-पूर्व जागेसाठी राखी जाधव निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.

दक्षिण मुंबईची जागा मागितली होती, परंतु त्या जागेवर नार्वेकर यांना उभे करण्याचा भाजपचा मानस  असल्याने आम्ही फार आग्रह धरला नाही. या जागेव्यतिरिक्त दुसरी जागा नव्हती.    - समीर भुजबळ,     मुंबई अध्यक्ष  

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४अजित पवार