Join us

हॉटेलवाल्यांनाही हवा वनटाईम परवाना

By admin | Updated: August 25, 2014 00:32 IST

दरवर्षीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी आम्हाला राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून वनटाईम परवाना देण्यात यावा अशी मागणी हॉटेलचालकांनी केली आहे

पनवेल : दरवर्षीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी आम्हाला राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून वनटाईम परवाना देण्यात यावा अशी मागणी हॉटेलचालकांनी केली आहे. या संदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा असा आग्रह या व्यावसायिकांनी धरला आहे. त्यामुळे विविध विभागाकडून होणारी अडवणूक थांबेल असे मत त्यांनी लोकमतकडे नोंदवले आहे. कोकणचे प्रवेशव्दार असलेल्या पनवेल परिसरात मोठया प्रमाणात हॉटेल अ‍ॅन्ड परिमिट रूम आहेत. याचे कारण म्हणजे हे ठिकाणी म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती आहे. त्याचबरोबर पनवेल परिसरात मुंबई- गोवा, मुंबई- पुणे, एनएच४बी, द्रुतगती महामार्ग जातात. या व्यतिरिक्त स्टील मार्केट, जेएनपीटी हे मोठे प्रकल्प पनवेलमध्ये आहेत. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायाचे जाळे पसरले आहे. परमिट रूमची अधिक मागणी असल्याने त्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे.मात्र त्याकरिता खाद्यगृह, अन्न आणि औषध प्रशासन, आयकर, विक्रीकर प्रमाणपत्र, दुकान अधिनियमन परवाना, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या नाहरकत प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. हे सर्व जमा करताना नाकीनऊ येते. प्रत्येक विभागाकडे वारंवार हेलपाटे आणि फेऱ्या माराव्या लागतात. आज या उद्या या असे सांगून हॉटेल व्यावसायिकांना वेठीस धरले जाते. त्याचबरोबर प्रत्येक वेळी आणि ठिकाणी वेगवेगळ्या त्रुटी काढून अडवणूक केली जात असल्याचे हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. मागील आठवड्यात जेएनपीटी येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्यातदारांना एकाच वेळी परवाना देण्याची घोषणा केली. त्यामुळे निर्यातवाढीला एक प्रकारे चालना मिळणार आहे.