Join us
Daily Top 2Weekly Top 5

वायुप्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात!

By admin | Updated: April 10, 2015 00:08 IST

धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या आयओटीएल या रासायनिक आणि तेल साठवणुकीच्या कंपनीतून सातत्याने होणाऱ्या नाफ्ता

उरण : धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या आयओटीएल या रासायनिक आणि तेल साठवणुकीच्या कंपनीतून सातत्याने होणाऱ्या नाफ्ता चोरी आणि हवेतील रासायनिक मिश्रित वायू प्रदूषणामुळे धुतूम ग्रामपंचायतीसह परिसरातील दोन चौरस किमी परिघातील गावातील हजारो ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामस्थांच्या आरोग्याबरोबरच सुरक्षेचा गंभीर प्रश्नही निर्माण झाल्याने कंपनी विरोधात ग्रामपंचायत सरपंच प्रेमनाथ ठाकूर आणि राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी उरण पोलीस, तहसीलदारांपासून जिल्हाधिकारी आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडेही तक्रारी दाखल केल्या आहेत आणि कंपनीच्या गलथान कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीत इंडियन आॅइल टँकिंग (आयओटीएल) कंपनी आहे. जेएनपीटी बंदरातून येणारे पेट्रोल, डिझेल, फर्नेश, नाफ्ता आणि इतर घातक रासायनिक द्रवपदार्थांची या कंपनीच्या टाक्यांत साठवणूक केली जाते. बऱ्याचदा कंपनीतून खराब आॅइल, नाफ्ता आणि इतर घातक रासायनिक पदार्थांची गळती होते. गळती झालेले घातक रसायनमिश्रित पाणी नाल्यामार्फत भात आणि मत्स्यशेतीत व खाडीत सोडले जाते. त्यामुळे शेतीचे आणि मच्छीमारांचे अतोनात नुकसान होते. त्याचबरोबर कंपनीतून निघणाऱ्या रसायनमिश्रित वायूमुळे हवेतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे अनेक नागरिक बेशुद्ध पडण्याच्या घटनाही घडल्या आहे. साधारणत: दोन चौरस किमी परिसरातील नागरिकांना उग्र वासाचा त्रास होऊ लागल्याने हजारो नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वाढते प्रदूषण आणि नाफ्ता चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कंपनीकडे सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना उपलब्ध नाहीत. तसेच ग्रामस्थांबरोबर कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या धोक्याच्या सूचनाही दिल्या जात नाहीत. तसेच भेटीस जाणाऱ्या राजिप सदस्य, ग्रामपंचायत, ग्रामस्थांबरोबर कंपनी अधिकारी उर्मटपणे वागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराबाबत तीव्र असंतोष खदखदत आहे. याबाबत कंपनी विरोधात धुतूम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमनाथ ठाकूर आणि राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी उरण पोलीस, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्याकडे संबंधित विभागांनी कानाडोळाच चालविला असल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. उलट औद्योगिक सुरक्षा व आरोग्य रायगड विभागाचे सहसंचालक एस.पी. राठोड यांनी सदरची घटना जलप्रदूषणाशी संबंधित असल्याचा दावा करीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधण्याची सूचना करून तक्रारदारांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. (वार्ताहर)