Join us

युनिव्हर्सल बिझनेस स्कूलला प्रवेशास 'एआयसीटीई'ची मनाई

By रेश्मा शिवडेकर | Updated: February 14, 2024 21:12 IST

संस्थेने मात्र प्रवेशाला निर्बंध घालण्याचा निर्णय अद्याप झाला नसून ती केवळ 'एआयसीटीई'च्या समितीची शिफारस आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

रेश्मा शिवडेकर/मुंबई: मान्यतेविना परदेशी संस्थांशी करार करून अभ्यासक्रम चालविल्याबद्दल आणि मुलाची फसवणूक केल्याबद्दल 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) कर्जतमधील 'युनिव्हर्सल बिझनेस स्कूल'ला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मनाई केली आहे. तसेच या संस्थेला दंडही ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. 

'एआयसीटीई'ने मंजूरी दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आणखी काही अभ्यासक्रम संस्था एकाच इमारतीत चालवत असल्याचे आढळून आले होते. 'कार्डिफ मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी'च्या सहकार्याने हा अभ्यासक्रम चालवला जात असल्याचे संस्थेचे म्हणणे होते. परंतु त्याला 'एआयसीटीई'ची परवानगी नाही. याबाबत 'एआयसीटीई'ने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे.

'युबीएस'च्या विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे सांगत महाविद्यालयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. मान्यतेविना अभ्यासक्रम चालविणाऱ्या अशा अनेक संस्थांवर विद्यापीठ अनुदान आयोगानेही या आधी अशी कारवाई केली आहे. ही बाब गंभीर असून याकरिता संस्थेला दंडही केला जाईल , असे 'एआयसीटीई'ने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

संस्थेने मात्र प्रवेशाला निर्बंध घालण्याचा निर्णय अद्याप झाला नसून ती केवळ 'एआयसीटीई'च्या समितीची शिफारस आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

टॅग्स :मुंबईमहाविद्यालय