Join us  

तेजस एक्स्प्रेसच्या 630 प्रवाशांना मिळणार 63,000 रुपयांची नुकसान भरपाई? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 4:58 PM

अहमदाबाद ते मुंबई 19 जानेवारीपासून तेजस एक्स्प्रेस सुरू झाली.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील अहमदाबाद-मुंबई तेजस एक्प्रेसला बुधवारी जवळपास 80 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या नियमानुसार, तेजस एक्स्प्रेसला एक तास उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये आणि दोन तास उशीर झाल्यास 250 रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. 

यानुसार, अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसमधून मुंबईत उतरलेल्या 630 प्रवाशांना प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे 63,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यासाठी आधी प्रवाशांना नुकसान भरपाईचा दावा करावा लागणार आहे. तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना अशाप्रकारे नुकसान भरपाई देण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये दिल्ली- लखनौ तेजस एक्स्प्रेसच्या 950 प्रवाशांना तीन तास उशीर झाल्यामुळे 250 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली होती. 

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर ते दहिसर जलद मार्गावर बुधवारी दुपारी 12.15 वाजता ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. दहिसर ते मीरा रोड येथील बिघाडाची दुरुस्ती दुपारी 12.30 वाजता तर, मीरा रोड ते भार्इंदर येथील बिघाडाची दुरुस्ती दुपारी 1.35 वाजता झाली. परिणामी, अहमदाबादहून मुंबईकडे येणाऱ्या तेजस एक्स्प्रेससह इतर एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाला. 

पश्चिम रेल्वे मार्गावरून अहमदाबाद ते मुंबई 19 जानेवारीपासून तेजस एक्स्प्रेस सुरू झाली. तेजस एक्स्प्रेस अहमदाबादहून सकाळी 6.40 वाजता सुटते. ती मुंबई सेंट्रलला दुपारी 1.10 वाजता पोहोचते. मात्र, गेल्या बुधवारी दुपारी 2.34 वाजता पोहोचली. एक्स्प्रेसमध्ये अहमदाबादहून सुटताना 879 प्रवासी प्रवास करीत होते. मात्र मुंबई सेंट्रलपर्यंत 630 प्रवासी प्रवास करणारे होते. 

नुकसान भरपाई प्रवाशांना अशी मिळू शकते...प्रवासी दावा करून 100 रुपयांचा परतावा घेऊ शकतात. आयआरसीटीसीनुसार 630 प्रवासी नुकसान भरपाईचा दावा करण्यास पात्र आहेत. यासाठी प्रवासी 1800-266-8844 या नंबरवर कॉल करू शकतात किंवा irctcclaim@libertyinsurance.in यावर मेल करू शकतात. याशिवाय, प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग केले होते. त्यांना परतावा मिळण्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिका-यांना प्रवाशाचा पीएनआर क्रमांक व अत्यावश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर प्रवाशांच्या ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर मेसेज येईल.

महत्त्वाच्या बातम्या

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

MNS Maha Adhiveshan Live : ‘जेंडर बजेट’ म्हणजे स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाबाबत शालिनी ठाकरेंनी मांडला ठराव

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

टॅग्स :तेजस एक्स्प्रेस