महाविद्यालयाबाहेर पालकांचे आंदाेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कन्सेंट फॉर्म (संमती पत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्याचा प्रकार नुकताच समोर आला. त्यांच्या प्रवेशाचा विषय अद्यापही मार्गी लागला नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील आणि पालक, विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाविद्यालयासमोर आंदोलन केले.
अकरावी प्रवेश प्रक्रिया संपलेली असताना महाविद्यालयाने एकाएकी प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर केल्याने हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत. चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डी. के. मराठे कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला असून, महाविद्यालय प्रशासनाकडून या ६५ विद्यार्थ्यांच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.
अकरावी प्रवेशप्रक्रियेत अनेक नामांकित महाविद्यालयांत प्रवेश फुल्ल झाले आहेत, तर अनेक महाविद्यालयांत ७५ टक्क्यांहून अधिक प्रवेश होऊन त्यांचे ऑनलाईन वर्गही सुरू झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत येऊन, त्यांनी महाविद्यालयांत जाऊन शुल्क भरून प्रवेश निश्चिती केल्यावर अचानक ६५ विद्यार्थ्यांची यादी लावून प्रवेश रद्द झाल्याचे महाविद्यालयाने जाहीर केले.
गुरुवारी आंदोलनानंतर स्वाती पाटील आणि पालकांनी प्राचार्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, पालकांचे समाधान झाले नाही. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत त्याची कारणे महाविद्यालय प्रशासनाने लिखित द्यावीत, अशी मागणी पाटील आणि पालकांनी केली.
उपसंचालक कार्यालयामार्फत चेंबूर विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांनीही पालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत प्रवेश निश्चित होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका पालक, विद्यार्थ्यांनी घेतली आहे. प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर संमतीपत्र दिले नसल्याचे कारण देऊन महाविद्यालयांकडून असे प्रकार घडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर शिक्षण विभागाने यासंदर्भात कठोर पावले उचलावीत आणि असे प्रकार यापुढे घडले तर या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
........................