Join us  

नागपाड्यात ‘सीएए’विरोधात आंदोलन; महिलांचा वाढता प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 1:27 AM

बुधवारी सकाळपासून महिलांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र होते.

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) नागपाडा येथे रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने महिला येथे आंदोलनासाठी येऊ लागल्या आहेत.बुधवारी सकाळपासून महिलांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र होते. हा अन्यायकारी कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा निर्धार महिलांनी केला आहे. देशातील ज्या राज्यांनी या कायद्याविरोधात संबंधित विधानसभांमध्ये ठराव मंजूर केला आहे. त्याप्रमाणे, महाराष्ट्रातदेखील महाविकास आघाडीने या कायद्याविरोधात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठविण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, हे स्पष्ट केले असले, तरी त्यासाठी अधिकृत ठराव करण्याची मागणी केली जात आहे. महिला घर चालवत आहेत व या कायद्याच्या विरोधात लढा उभारून देश वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत या आंदोलनात सहभागी झालेल्या कायद्याच्या विद्यार्थिनी फातमा जोहरा यांनी व्यक्त केले.कायदा व संविधान याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे, येथे आलेल्या महिला आंदोलकांमध्ये याबाबत जागृती केली जात असल्याची माहिती फातमा यांनी दिली. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना जेवण व इतर सुविधा स्थानिक नागरिक पुरवित आहेत. मुंबईत थंडीचा जोर वाढू लागलेला असताना महिला मात्र रात्रीदेखील आंदोलनात सहभागी होऊन या कायद्याचा निषेध करण्यावर ठाम आहेत. या कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या बंदला नागपाडा परिसरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. या परिसरातील दुकाने, हॉटेल बंद करण्यात आली होती.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयकमुंबई