Join us  

राष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 4:55 PM

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता.

ठाणे (प्रतिनिधी) - वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता. या आंदोलनाचा धसका घेतलेल्या एमएसआरडीसीने तत्काळ पावले उचलली. ऐरोली किंवा मुलुंड यापैकी एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची सूट वाहनचालकांना दिला आहे. शनिवारी पत्राद्वारे दिलेल्या इशार्‍यामुळे रविवारपासून एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. 

ठाणे शहरात प्रवेश करणार्‍या मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर टोलवसुली केली जात असल्याने पश्चिम द्रूतगती मार्गासह सबंध ठाणे शहरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला जबाबदार सदरचे टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवर टोलवसुलीसाठी मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत असल्याने हे टोलनाके बंद करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी मध्यंतरी आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा टोल वसुली सुरुच ठेवण्यात आलेली असल्याने परांजपे यांनी एमएसआरडीसी आणि स्थानिक पोलिसांना पत्र देऊन सोमवारी उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर एमएसआरडीसीने तत्काळ सूत्रे हलवून एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची मुभा वाहनचालकांना दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशार्‍यानंतर  मुलूंड आणि ऐरोली टोलनाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यांपैकी एकाच टोलवर वसुली करावी, असे आदेश टोल कंपनीला दिले होते. मुलुंड टोल नाक्यावर पैसे भरल्यास ती पावती ऐरोली टोल नाक्यावर दाखवून मोफत जाता येईल किंवा ऐरोली टोल भरल्यास मुलुंड टोल नाक्यावर पैसे घेण्यात येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणीदेखील रविवारपासून सुरु करण्यात आली आहे.  

टॅग्स :टोलनाकामुंबई