Join us

ट्रान्सफॉर्मर जळाल्याने आदिवासी पाडे अंधारात

By admin | Updated: July 6, 2015 04:03 IST

डहाणू तालुक्यातील कोसबाड-चिंबावे (शेतीपाडा) येथील रडका कोद्या यांच्या चिकू बागेतील ट्रान्सफॉर्मर १५ दिवसांपूर्वी जळाला आहे.

घोलवड : डहाणू तालुक्यातील कोसबाड-चिंबावे (शेतीपाडा) येथील रडका कोद्या यांच्या चिकू बागेतील ट्रान्सफॉर्मर १५ दिवसांपूर्वी जळाला आहे. शेतीपाडा व चिंबावे हे आदिवासी पाडे वीजपुरवठा खंडित झाल्याने १५ दिवस अंधारात आहेत. वेळोवेळी महावितरणला तक्रारी देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरणच्या कोसबाड विभागांतर्गत हा ट्रान्सफॉर्मर येतो. मात्र, आदिवासी वीजग्राहकांना ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. त्याचबरोबर कर्मचारी उद्धटपणे बोलतात, असेही ग्रामस्थ सांगतात. या ट्रान्सफॉर्मरच्या वीजजोडणीवर २५ ते ३० घरे तसेच शेतीपंप अवलंबून आहेत. सध्या पाऊस नसल्याने भातशेतीला विजेअभावी पंपाने पाणी देता येत नाही. परिणामी, भातपीक पाण्याअभावी करपण्यास सुरुवात झाली आहे. येथील शेतकरी हवालदिल झाले असून दुबार पेरणीच्या संकटाने चिंताग्रस्त आहेत. शेतीपाडा ट्रान्सफॉर्मरवर वीजभार जास्त आहे, असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याच भागात चिंबावे, नारळीपाडा, शेतीपाडा असे तीन ट्रान्सफॉर्मर आहेत. यांच्या वीजवाहिन्याही जवळूनच गेल्या आहेत. अशा परिस्थितीत जवळील ट्रान्सफॉर्मरवरून वीजजोडणी मिळावी किंवा जळालेला ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून मिळावा व खंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर )