मुंबई : सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात पूर्णपणे पाडण्यात आला. हा पूल बांधण्यासाठी मुंबई पालिकेला अद्यापही वेळ मिळालेला नसून आता पावसाळ्यानंतरचा मुहूर्त या पुलाच्या कामासाठी निवडण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तत्पूर्वी ८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात हँकॉक पूल बांधण्यासंदर्भात सुनावणी होत असून, न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. हा पूल जुना आणि धोकादायक झाला होता, तसेच ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंचीही कमी असल्याने, मध्य रेल्वेवरील गाड्यांना भायखळा व सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान वेगमर्यादा घालण्यात आली होती. या पुलावर पालिकेकडून १८ नोव्हेंबर २०१५पासून जमीनदोस्त करण्याची कारवाई हाती घेण्यात आली. त्यामुळे हँकॉक पूल वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर येणाऱ्या या पुलाचा महत्त्वाचा भाग २०१६च्या जानेवारी महिन्यात ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. (प्रतिनिधी)
हँकॉक ब्रिजच्या कामाला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त?
By admin | Updated: March 28, 2017 06:31 IST