Join us
Daily Top 2Weekly Top 5

भांडणानंतर विवाहितेची हत्या, पती गजाआड

By admin | Updated: September 9, 2016 05:04 IST

पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर, २८ वर्षीय पतीने तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली.

मुंबई : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर, २८ वर्षीय पतीने तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून, माहीम पोलिसांनी आरोपी पती समीर घोष याला बेड्या ठोकल्या आहेत.माहीम पश्चिमेकडील अत्तरवाला चाळीमध्ये राहणाऱ्या नोमीला घोष यांच्या घराच्या पोटमाळ्यावर, समीर हा त्याची पत्नी संपा (२०) हिच्यासोबत राहात होता. बुधवारी रात्री ३ च्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.याच भांडणातून समीरने संपाला मारहाण करत तिचा गळा आवळला. जीव वाचविण्यासाठी संपाने जेव्हा आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली, तेव्हा नोमीला घोष तिच्या मदतीसाठी धावल्या. संपा बेशुद्ध होऊन बेडवर पडली असल्याचे लक्षात येताच, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या माहीम पोलिसांनी समीरला ताब्यात घेत, संपाला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल केले. संपा हिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॅक्टरांनी घोषित केल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून, समीरला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.