Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई रागावल्याने मैत्रिणीसह सोडले घर, चेंबूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 03:57 IST

आई रागावल्याने अल्पवयीन मुलीने मैत्रिणीसह घर सोडल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला. चेंबूर पोलिसांनी दोघींचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले.

मुंबई : आई रागावल्याने अल्पवयीन मुलीने मैत्रिणीसह घर सोडल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला. चेंबूर पोलिसांनी दोघींचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले.चेंबूरच्या न्यू आर.एन.ए. कॉलनी परिसरात १५ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. ती नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. घराशेजारी असलेल्या इमारतीत तिची मैत्रीण रेश्मा (१५) राहते. दोघेही जीवलग मैत्रिणी. १५ तारखेला सायंकाळी ७च्या सुमारास नेहा घरात काहीही न सांगता निघून गेली. ती घरात झोपली असेल, म्हणून कुणाचे त्याकडे लक्ष गेले नाही. १६ तारखेला दुपारी १२ वाजता घरच्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली, तेव्हा नेहा घरात दिसून आली नाही. परिसरात कुटुंबीयांनी शोध घेतला. ती कुठेच सापडली नाही़ तिच्या भावाने रेश्माच्या घरी विचारणा केली, तेव्हा रेश्माला आई ओरडल्याने ती १५ तारखेपासून गायब असल्याचे समजले. सहा महिन्यांपूर्वी नेहाने अशाच प्रकारे रेश्मासोबत घर सोडले होते. त्यानंतर, ती स्वत:च घरी परतली होती.त्यामुळे त्या दोघी बाहेर फिरायला गेल्या असल्याची खात्री कुटुंबीयांना झाली. १६ तारखेलाही रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची चिंता वाढली. अखेर १७ तारखेला नेहाच्या भावाने आर.सी.एफ. पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :मुंबई