Join us  

विना मास्क नागरिकांना २०० रुपये दंड केल्यानंतर आता देणार मोफत मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 3:14 PM

BMC News : विना मास्क वावरणार्‍या ४ लाख ८५ हजार   नागरिकांकडून आतापर्यंत १० कोटी ७ लाखांचा दंड वसूल 

मुंबई : कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने आता घेतला आहे. दरम्यान, विना मास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर  फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जाणार आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी  पथके तयार के. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. विना मास्क नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरते आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्यामुंबई