Join us  

साडेचार वर्षांनी अजय पूरकरचे रंगभूमीवर पुनरागमन, 'फ्रेंड रिक्वेस्ट'द्वारे येणार रसिकांच्या भेटीला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 4:50 PM

रंगभूमीला कलाकारांवर संस्कार करणारी शाळा मानणारा अजय जवळपास साडेचार वर्षांनी पुन्हा नाटकांकडे वळला असून, नातेसंबंधांवर भाष्य करणारे 'फ्रेंड रिक्वेस्ट' हे त्याचे नवे नाटक येणार आहे.

मुंबई - आजवर बऱ्याच नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेला अभिनेता अजय पूरकर मागील काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावर रमला होता. रंगभूमीला कलाकारांवर संस्कार करणारी शाळा मानणारा अजय जवळपास साडेचार वर्षांनी पुन्हा नाटकांकडे वळला असून, नातेसंबंधांवर भाष्य करणारे 'फ्रेंड रिक्वेस्ट' हे त्याचे नवे नाटक येणार आहे.

साडेचार वर्षांपूर्वी 'ढाई अक्षर प्रेम के' या नाटकानंतर अजय चित्रपटांमध्ये बिझी झाला होता. मध्यंतरीच्या काळात अजयने मराठीसोबत तेलुगू आणि हिंदी चित्रपटही केले. 'पावनखिंड' आणि 'सुभेदार' या चित्रपटांमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि तान्हाजी मालुसरे या शिवकालीन इतिहासातील अजरामर व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर सजीव करणारा अजय 'फ्रेंड रिक्वे्स्ट' या नाटकाद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी केले आहे. सवाईगंधर्व, जमदग्नीवत्स आणि व्यास क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या नाटकात आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर आणि अतुल महाजन हे कलाकार आहेत. अजयने आकाश भडसावळे, शैलेश देशपांडे आणि वैशाली गायकवाड यांच्या साथीने नाटकाची निर्मितीही केली आहे. याबाबत 'लोकमत'शी बोलताना अजय म्हणाला की, माझ्यासारखा अभिनेता नाटकापासून फार काळ दूर राहू शकत नाही. रंगभूमी दररोज काही ना काही शिकवत कलाकारांना प्रगल्भ करत असते. मागील सहा महिन्यांपासून नाटक करण्याची खूप इच्छा होती. 

नाटकासाठी इतका आतुरलो होतो की, प्रायोगिक नाटकातही काम करायला तयार होतो. सहा महिन्यांमध्ये खूप नाटकांचे वाचन केले, पण एकही मनाला पटले नाही. नेपथ्यकार संदेश बेंद्रेचा कॅाल आला. त्याने या नाटकाबद्दल सांगितले. 'फ्रेंड रिक्वेस्ट' वाचल्यावर हे आजचे असल्याचे जाणवल्याने होकार दिला. लेखन खूप आवडले. सोहोनींसारखे ज्येष्ठ दिग्दर्शक दिग्दर्शन करणार होते. त्यांची ही ११९वी कलाकृती आहे. त्यांच्यासोबत प्रथमच काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे नकार द्यायला वावच नव्हता. शैलेश देशपांडे यांच्याशी बोलल्यावर नाटकाची निर्मितीही करायचे ठरवले. सोहोनींसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकासोबत काम करताना नाटक बसवताना ते काय विचार करतात ही प्रोसेस जाणून घेता आल्याचेही अजय म्हणाला. 

रंगभूमी कलाकारांवर संस्कार करते...शाळा जशी आपल्यावर संस्कार करते तशी रंगभूमीही संस्कार करते. इथे रिटेक नसल्याने तो संस्कार पुन्हा घडावा, पुन्हा काहीतरी नवीन शिकता यावे, पुन्हा एकदा नट आणि माणूस म्हणून समृद्ध व्हावे असे वाटल्याने नाटकाकडे वळलो. यात माधव सहस्रबुद्धे नावाच्या उच्चभ्रू वस्तीतील व्यक्तीची भूमिका साकारली आहे. हा खूप श्रीमंत आहे. एका कंपनीचा सीईओ आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून, एखादी फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा त्या फ्रेंड रिक्वेस्टशी निगडीत असलेल्या तीन-चार लोकांची आयुष्य कशी बदलू शकतात याची हि गोष्ट असल्याचे अजय म्हणाला. 

टॅग्स :नाटक