Join us  

अखेर ‘त्या’ पोलीस ठाण्यांना वाली मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:47 AM

भांडुपमध्ये एकामागोमाग एक घडलेले हत्याकांड तसेच वाढत चाललेल्या गँगवॉरमुळे भांडुपचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची बदली करण्यात आली.

मुंबई : भांडुपमध्ये एकामागोमाग एक घडलेले हत्याकांड तसेच वाढत चाललेल्या गँगवॉरमुळे भांडुपचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची बदली करण्यात आली. त्यांची रवानगी सशस्त्र पोलीस दलात करण्यात आली. त्याचबरोबर, मुंबईतील नागपाडासारख्या संवेदनशील पोलीस ठाण्याबरोबरच भोईवाडा पोलीस ठाण्याला वाली मिळाला.पन्हाळे यांच्या रिक्त झालेल्या जागी अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांची नियुक्ती करण्यात आली, तर गुन्हे शाखा कक्ष ९चे पोलीस निरीक्षक महेश देसाई आणि वाहतूक शाखेतील जितेंद्र भावसार या दोघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली. देसाई यांना गुन्हे शाखा, तर भावसार यांना वाहतूक विभाग दाखविण्यात आला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या नागपाडा पोलीस ठाण्याची धुरा गुन्हे शाखा कक्ष १चे संतोष बागवे यांच्या हाती देण्यात आली आहे. अवघ्या दोन पोलीस निरीक्षक नागपाडा पोलीस ठाण्याची जबाबदारी हाताळत होते. विशेष शाखेतील रामचंद्र जाधव यांच्या खांद्यावर भोईवाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.रिक्त असलेल्या परिमंडळ ३च्या पोलीस उपायुक्त पदाची धुरा अमरावती ग्रामीणचे अधीक्षक अभिनाश कुमार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांची मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून गृहमंत्रालयाने बदली केलीहोती.

टॅग्स :पोलिस