Join us

अखेर मान्सून मुंबईत धडकला

By admin | Updated: June 21, 2016 03:32 IST

पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना अखेर सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने दिलासा दिला. पूर्व विदर्भातून राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने दोन दिवसांनी सोमवारी मुंबईत आगमन केले

मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना अखेर सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने दिलासा दिला. पूर्व विदर्भातून राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने दोन दिवसांनी सोमवारी मुंबईत आगमन केले आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पहिल्याच दिवशी दिलासा दिला. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मान्सून सोमवारी मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मान्सूनने मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांना दिलासा दिला आहे. सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने कुलाबा, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर, सायन आणि कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड व वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि जोगेश्वरीत जोरदार हजेरी लावली. मुंबईकरांनी मान्सूनचे जल्लोषात स्वागत केले आणि समुद्र किनाऱ्यांसह ठिकठिकाणी पहिल्या पावसात चिंब भिजत आनंद लुटला.पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूकीचा समावेश होता. येत्या २४ तासांसाठी शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. ४८ तासांसाठी उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा भाग, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशचा आणखी भाग आणि बिहारमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. (प्रतिनिधी)