Join us  

आफताब शिवदासानीची दीड लाखाची फसवणूक, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 3:01 PM

याप्रकरणी त्याने मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासानी हा सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. त्याला केवायसी (नो युवर कस्टमर) सायबर फसवणुकीत १.५० लाख रुपये गमवावे लागले. याप्रकरणी त्याने मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे (पश्चिम) येथील माऊंट मेरी रोड परिसरातील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय अभिनेत्याचे ॲक्सिस बँकेत बचत खाते आहे. रविवारी संध्याकाळी त्याला एका अनोळखी क्रमांकावरून एसएमएस आला. त्याचे खाते निलंबित केले जाईल, असेही त्यात नमूद करत त्याने दिलेल्या लिंकवर क्लिक करून तपशील अपडेट करण्याची विनंती केली गेली. जेव्हा अभिनेत्याने या लिंकवर क्लिक केले तेव्हा त्या खासगी बँकेचे एक वेब पृष्ठ (बहुधा बनावट) उघडले. यावेळी त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉलदेखील आला. 

खात्यातून १ लाख ४९ हजार रुपये डेबिटकॉलरने स्वतःची ओळख ॲक्सिस बँकेचा एक्झिक्युटिव्ह म्हणून दिली. आफताबला त्याचे केवायसी तपशील अपडेट करण्यात मदत करण्याचा बहाणा करत त्याचा मोबाइल नंबर एमपीआयएन या ऑनलाइन पृष्ठावर टाकण्याची सूचना देण्यात आली होती. तो  तपशील भरल्यानंतर, त्याच्या बँक खात्यातून १ लाख ४९ हजार ९९९ रुपये डेबिट झाले, असे शिवदासानी याने एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर कॉलरनेही फोन बंद केला. शिवदासानी याने ताबडतोब बँकेच्या व्यवस्थापकाला सायबर घोटाळेबाजांनी आपली फसवणूक केल्याचे कळवले. 

टॅग्स :आफताब शिवदासानीधोकेबाजी