Join us

म्हाडाच्या घरासाठी सहा एप्रिलला जाहिरात?

By admin | Updated: March 29, 2015 00:53 IST

महानगरातील हक्काच्या निवाऱ्यासाठी म्हाडाच्या घराच्या लॉटरीकडे लक्ष ठेवून असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर आहे.

जमीर काझी ल्ल मुंबईमहानगरातील हक्काच्या निवाऱ्यासाठी म्हाडाच्या घराच्या लॉटरीकडे लक्ष ठेवून असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. येत्या ३१ मे रोजी काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीसाठी येत्या ६ किंवा ७ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाढीव किंमती आणि अत्यल्प उत्पन्न गटातील प्रस्तावित घराची किंमत अल्प गटातील घरापेक्षा जास्त असण्याबाबतची तफावत दूर करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर जाहिरात दिली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.यावर्षी मुंबईतील ९८९ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहेत. त्यासाठी ३१ मे रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता मागील ५ वर्षापासून दरवर्षी याच तारखेला सोडत काढली जाते. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे गेल्यावेळी मात्र म्हाडाचा हा ‘मुहूर्त’ हुकला होता.यंदा सर्वच उत्पन्न गटातील सदनिका महागड्या आहेत. त्याचबरोबर े मुंबईतील विविध ठिकाणच्या सोडत काढण्यात येणाऱ्या ९८९घरांचे दराचा जो प्रस्ताव निश्चित केला होता त्यामध्ये मोठा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दर निश्चिती समितीतील अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) मालवणी मालाड येथील घरांची किंमत २० लाख ३४ हजार ६०१ इतकी ठरविली असून या गटापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या म्हणजेच अत्यल्प उत्पन गटातील (ईडब्ल्यूएस) मानखुर्द येथील घरे त्यापेक्षा तब्बल साडे पाचलाखानी महाग आहेत. याठिकाणची ६६ घरे लॉटरीत असून त्याची किंमत २५ लाख ७८ हजार १०० रुपये इतकी ठरविली आहे. त्याचप्रमाणे गोरेगाव उन्नतनगरातील अत्यल्प उत्पन गटातील घरे ही मालवणीतील अल्प उत्पन्न गटापेक्षा जवळपास ५० हजारांनी महागडी आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष झेंडे यांच्यासमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केल्यानंतर ही त्रुटी लक्षात आली आहे. उपाध्यक्षांनी मंडळांच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत नव्याने सुधारित प्रस्ताव बनविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात घरांच्या अंतिम दरनिश्चितीला संमती मिळाल्यानंतर ६ किंवा ७ एप्रिलला घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. (प्रतिनिधी)वाढत्या महागाईमुळे म्हाडाने २०१३च्या अखेरीस उत्पन्न गटाच्या मर्यादेत वाढ केली असून मासिक १६ हजार किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणारे अत्यल्प (ईडब्ल्यूएस) तर ४० हजार रुपये उत्पन्न असणाऱ्याचा समावेश अल्प उत्पन (एलआयजी) गटात समाविष्ट केला आहे. त्यामुळे यावषी घराच्या प्रास्ताविक दर निश्चितीतील त्रुटीमुळे १६ हजार कमविणाऱ्या व्यक्तीला ४० हजार मिळविणाऱ्या नागरिकापेक्षा म्हाडाच्या घरासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीमुळे मेतकुटीस आलेले सर्वसामान्य नागरिकांचे मुंबईतील घर मिळविणे केवळ स्वप्नच राहू शकेल.सोडतीसाठी निश्चित केलेल्या सदनिकांचे छायचित्र वेबसाईटवर उपलब्ध केले जाणार आहे. मजला, फ्लॅटची दर्शनी बाजू, तेथे देण्यात येणाऱ्या भिंतीचा रंग आदीची माहिती दिली जाणार असून इच्छुकांना पंसतीनुसार संबंधित घरासाठी अर्ज भरता येईल.