Join us  

दत्तक दिलेल्या मुलाचा जन्मदात्या वडिलांच्या संपत्तीत वाटा नाही: उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 4:45 AM

दत्तक दिल्यानंतर संबंधित पाल्याचे त्याच्या जन्मदात्या कुटुंबाशी नाते तुटते आणि दत्तक घेतलेल्या कुटुंबामध्ये त्याचा नव्याने जन्म होतो.

मुंबई : दत्तक दिल्यानंतर संबंधित पाल्याचे त्याच्या जन्मदात्या कुटुंबाशी नाते तुटते आणि दत्तक घेतलेल्या कुटुंबामध्ये त्याचा नव्याने जन्म होतो, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका वृद्ध व्यक्तीला त्याच्या जन्मदात्या वडिलांच्या जमिनीत वाटा देण्यास नकार दिला.

वर्धा येथील समुद्रपूर तालुक्यातील पंढरी मुंडे (६९) यांनी त्यांचे जन्मदाते वडील महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालकीच्या १६ एकर शेतकी जमिनीतील हिस्सा त्यांच्या भावंडांकडून मागितला. मात्र, भावंडांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी हिंगणघाट दिवाणी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांचा अपील फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

पंढरी मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, महादेव मुंडे हे त्यांचे जन्मदाते असून त्यांनी त्यांचा भाऊ फकिरा यांना आपला सांभाळ करण्यासाठी दिले. मात्र, दत्तक दिले नव्हते. तशी कागदपत्रे नाहीत. त्यामुळे जन्मदात्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या १६ एकर शेतकी जमिनीवर आपलाही अधिकार आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती विकून भावंडांनी संयुक्त कुटुंबासाठी घेतलेल्या संपत्तीवर आपलाही अधिकार आहे.पंढरी यांच्या याचिकेवर त्यांच्या भावंडांनी आक्षेप घेतला. पंढरी यांना फकिरा यांना दत्तक देण्यात आले होते.

महसूल विभागाकडे असलेल्या कागदपत्रांवर त्यांच्या नावापुढे फकिरा यांचे नाव लावण्यात आले आहे. महादेव व फकिरा यांच्या हयातीतच मुंडे परिवाराच्या संपत्तीचे हिस्से करण्यात आले. त्यापैकी १६ एकर जागा फकिरा व तेवढीच जागा महादेव यांच्या वाट्याला आली. फकिरा यांच्या इच्छापत्रानुसार, त्यांची पत्नी जिवंत असेपर्यंत सर्व संपत्ती त्यांच्या पत्नीच्या नावे असेल व पत्नीच्या मृत्यूनंतर ती संपत्ती दत्तक घेतलेला मुलगा म्हणजेच पंढरी यांच्या मालकीची होईल. त्यानुसार फकिरा यांची सर्व संपत्ती पंढरी यांच्या नावे करण्यात आली आहे.

दरम्यान, पंढरी यांनी न्यायालयात सादर केलेल्या सर्व कागदपत्रांवर त्यांच्या वडिलांचे नाव महादेव असे असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. मात्र, त्यावर त्यांच्या भावडांनी आक्षेप घेतला. पंढरी यांनी सत्र न्यायालयात घेण्यात आलेल्या उलटतपासणीत न्यायालयापुढे मान्य केले आहे की, दावा दाखल केल्यानंतर त्यांनी कागदपत्रांत बदल केला आहे.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत म्हटले की, पंढरी यांनी स्वत:च मान्य केले आहे की त्यांनी दावा दाखल केल्यानंतर सर्व कागदपत्रांवर त्यांच्या वडिलांचे नाव महादेव असे लावले आहे. तसेच महसूल विभागाकडे असलेल्या कागदपत्रांवर त्यांच्या वडिलांचे नाव फकिरा असे दाखविण्यात आले आहे.

‘फकिरा यांनी पंढरी यांना लहानपणापासून मुलासारखे सांभाळले. पंढरी यांनी फकिराच्या शेतीचा सांभाळ केला व त्यांच्या संपत्तीतून आणखी काही जमिनी खरेदी केल्या आणि त्यातून उत्पन्न कमाविले, यात वाद नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.‘मुलाचा दत्तक गेलेल्या घरात नवा जन्म होतो’

‘पंढरी यांना फकिरा यांनी दत्तक घेतल्यानंतर त्यांचा त्यांच्या जन्मदात्या कुटुंबाशी संबंध संपुष्टात येतो. दत्तक दिल्यानंतर संबंधित मुलाचे जन्मदात्या कुटुंबाशी नाते संपते आणि दत्तक घेतलेल्या घरात नव्याने जन्म होतो,’ असे न्यायालयाने म्हणत पंढरी यांचा महादेव यांच्या संपत्तीवरील दावा फेटाळला.

टॅग्स :उच्च न्यायालय