Join us

स्मार्टसिटीसाठी सल्लागार नेमणार

By admin | Updated: November 29, 2015 01:25 IST

ठाणे शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरात विविध स्वरूपांचे ह्यपब्लीक प्रायवेट पार्टनरश्ीप (पीपीपी)च्या माध्यमातून प्रकल्प हाती घेतले आहेत.

ठाणे : ठाणे शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरात विविध स्वरूपांचे ह्यपब्लीक प्रायवेट पार्टनरश्ीप (पीपीपी)च्या माध्यमातून प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच ठाणेकरांच्या सूचनाही मागविल्या आहेत. परंतु, यापुढेही जाऊन शहराला ‘स्मार्ट टच’ देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रपोजल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पालिका आता सल्लागार नेमणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात ठाणे शहर कसे असावे?, त्या ठिकाणी कशा प्रकारच्या सुविधा असाव्यात? तसेच नळ, लाइट, रस्ते, फूटपाथ, गटारे, इमारती, पार्किंग, डम्पिंग यांचे नियोजन कशा पद्धतीने आखले जावे़?, यासाठी पालिकेने आता विविध स्वरूपांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आतापर्यंत पालिकेने १८ प्रकल्प हाती घेतले असून ते सर्वच पीपीपीच्या माध्यमातून साकार होणार आहेत. यासाठी आता ठाणेकरांचीही मदत घेतली जात असून २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ठाणेकरांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याकडून आॅनलाइन सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट सिटीच्या संदर्भात निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या आहेत. यापुढेही जाऊन शहरातील काही तज्ज्ञ व्यक्तींकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता शहराला स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट सिटी प्रपोजल तयार करण्यात येणार आहे. यासाठी आता सल्लागार नेमला जाणार असून यासाठी पालिकेने १ कोटी २५ लाख ४० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.