Join us

विमाननिर्मितीच्या अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदाही फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईभारत सरकार, महाराष्ट्र शासन व डॅ सॉल्ट एव्हिएशन, फ्रान्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

भारत सरकार, महाराष्ट्र शासन व डॅ सॉल्ट एव्हिएशन, फ्रान्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर हा ट्रेड मागील वर्षीपासून सुरू झाला असून या ट्रेडसाठीचे प्रवेश यंदाही फुल्ल झाल्याची माहिती आयटीआय संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली आहे. नुकतेच फ्रान्सचे राजदूत एच. इ. इम्यॅन्युअल लेनिन यांनी नागपूरच्या या विशेष तुकडी व संस्थेला भेट दिली असून, तेथील प्रशिक्षणार्थ्यांशी ही संवादही साधला. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासाठी फ्रान्सच्या निर्देशकांना येथे पाचारण करण्यात आले असून ते या संस्थेत प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे नागपूर आयटीआय हे राज्यातील एकमेव आयटीआय आहे, जिथे फ्रेंच निर्देशकांकडून विद्यार्थ्यांना धडे मिळत आहेत.

डॅ सॉल्ट एव्हिएशन कंपनी, फ्रान्स यांचा केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाशी सामंजस्य करार झाला आणि या अभ्यासक्रमाची जबाबदारी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, मुंबईने नागपूरच्या शासकीय आयटीआयवर सोपविली. नागपुरातील मिहानमध्ये विमानांच्या देखभाल व दुरुस्ती कंपन्या आपला विस्तार करीत आहे. त्या दृष्टिकोनातून विदर्भातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्विपमेंट फिटर’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. यासाठी विशेष फ्रान्सच्या निदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिन्यात राज्यपालांनी या आयटीआयला भेट दिली, तेव्हा या फ्रेंच निदेशक अलेड डोरियथ, रिचर्ड प्रायमॉल्ट, क्रिष्टीलिनी कॅरी, लुक सौदन यांच्याशी त्यानी संवाद साधला.

प्लेसमेंटची चिंता नाही

या व्यवसायासाठी आवश्यक असलेले साहित्य व यंत्रसामग्री, तसेच प्रशिक्षणासाठी ट्रेनर्स, डॅ सॉल्ट एव्हिएशन फ्रान्स यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. सदर व्यवसाय भारतामध्ये एकमेव औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे सुरू आहे. सदर व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना संपूर्ण भारतभरातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून एव्हिएशन सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तसेच या प्रशिक्षणार्थ्यांना हाय एंड ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमधूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. हे प्रशिक्षणार्थी भविष्यात एव्हिएशन सेक्टरमध्ये उच्च शिक्षणही घेऊ शकतात. नागपूरमध्येच डॅसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड, नागपूर, टीएएल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लिमिटेड, एअर इंडिया एमआरओ लिमिटेड येथे या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटची कोणतीच चिंता भविष्यात नाही, अशी माहिती कुशवाह यांनी दिली.

अभ्यासक्रमाला मागणी सुरूच

सन २०१९ मध्ये २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू झाली. २० जागांसाठी पहिल्याच वर्षी ५७१ अर्ज आले होते. तेव्हा ९३ टक्क्यांपर्यंत कटऑफ गेला होता. यंदा आयटीआयने दुसरीही तुकडी सुरू केली आहे. त्यामुळे आता ४० जागा आहेत. ९५ टक्के गुण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळले आहेत. यंदाचा कटऑफ ही ८३ टक्क्यांच्या वर असून संपूर्ण राज्यातून आणि इतर राज्यांतूनही या अभ्यासक्रमासाठी विचारणा होत असल्याची माहिती नागपूर आयटीआयचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी दिली.