वैभव गायकर, पनवेलपनवेलमधील जुन्या तलाठी कार्यालयात अनेक महत्त्वाची कागदपत्रे उघड्यावर पडून असल्याने त्यांचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपासून हे कार्यालय नवीन तहसील कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र कागदपत्रे ठेवण्यात आलेल्या जुन्या कार्यालयात कोणतीही सुरक्षा नाही. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे. जुन्या तहसील कार्यालयात मौजे पोयंजे येथील मंडळ अधिकारी, मोर्बे, कर्नाळा येथील सर्कल अधिकारी आदींची कार्यालये आहेत. या क्षेत्रातील नागरिकांची ओळखपत्रे, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्रे, शासनाच्या आम आदमी विमा योजनांचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र, तहसीलदारांचा शिक्का, मंडळ अधिकाऱ्यांची मासिक नोंदवही, काही जमिनींच्या संचिका यांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे तिथे पडलेली आहेत. सध्या पनवेल परिसरातील जागांना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रकरणे घडत आहेत. खोटी कागदपत्रे, खोटी ओळखपत्रे यांच्या आधारे काही समाजकंटक गैरप्रकार व फसवणूक करीत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. जुन्या तलाठी कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे सर्वत्र पडलेली दिसतात. या कागदपत्रांचा फायदा घेऊन गैरप्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
प्रशासकीय दस्तावेज वाऱ्यावर
By admin | Updated: June 27, 2015 01:27 IST