पनवेल : शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकिय भवन उभारण्यात येणार आहे. अत्याधुनिक सोईसुविधा असणाऱ्या या इमारतीच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. ही एकूण तीन मजली इमारत असून येत्या दोन वर्षात काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळयाच्या बाजूला पनवेल तहसिल, कोशागार, वन विभाग, निबंधक आणि पोलीस ठाणे ही कार्यालये होती. या इमारती ब्रिटीशांच्या काळातील असल्याने मोडकळीस आल्या. एकंदरीतच या ठिकाणी काम करणेही महसुल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिकिरीचे बनत चालले होते. या व्यतिरिक्त वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने वाहतुक कोंडी नित्याचीच बनली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून जुन्या इमारती जमीनदोस्त करून तिथे नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. आजूबाजूची सर्व शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला, मात्र त्या संदर्भात निर्णय घेण्यास विलंब लागला. आमदार विवेक पाटील यांनीही पनवेलचे उरणचे आमदार असताना या कामासाठी पाठपुरावा केला, मात्र प्रशासकिय भवनाच्या फाईलवरील धुळ काही झटकण्याची तसदी शासन घेत नव्हत. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून या प्रस्तावाला मंजूरी देण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला प्रशासकिय मंजूरी मिळाली. तहसिल कार्यालय, कोषागार कार्यालय महसुल प्रबोधनीत हलविण्यात आले, मात्र पोलीस ठाणे या ठिकाणी हलविण्यास विलंब लागला. जितकी जागा घेता तितकीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे, या मुद्दयावर नवी मुंबई पोलीस अडून बसले होते. त्यानुसार आराखडयात बदल करण्यात आला, तसेच पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाजीराव भोसले यांनी पुढाकार घेऊन पोलीस ठाणे महसुल प्रबोधनीत हलविण्यात आले. परिणामी, प्रशासकिय भवनाचा मार्ग मोकळा झाला असून जुन्या इमारती जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)
पनवेलमध्ये साकारणार प्रशासकीय भवन
By admin | Updated: June 9, 2014 01:45 IST